कोरेगाव : आमदार झाल्यानंतर कोविडच्या साथीत हजारो रुग्णांचे स्वखर्चाने वाचवलेले प्राण, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मतदारसंघात केलेली हजारो कोटींची विविध विकासकामे, जनतेच्या संपर्काच्या जोरावर शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी सलग दुसऱ्यावेळी महाविकास आघाडीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा दारुण पराभव करत पुन्हा एकदा आमदारकी पदरात पाडून घेतली आहे.
कोरेगाव मतदारसंघाच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महेश शिंदे यांच्या गळ्यात अल्प मतांनी का होईना विजयाची माळ घातली
विधानसभा निवडणूक झाली आणि महाविकास आघाडी सरकार आले. पराभव होऊनही शरद पवार यांनी लागलीच शशिकांत शिंदे यांना विधान परिषद देऊन ताकद दिली. त्यामुळे दोघेही सत्ताधारी; परंतु वेगवेगळ्या पक्षांतील आमदार झाले. सुरुवातीला दोघे संथगतीने अंदाज घेत काम करत होते. यादरम्यान कोविडची महामारी आली. त्यात महेश शिंदे यांनी तालुक्यामध्ये स्वतः स्वखर्चाने कोविड उपचार केंद्र सुरू करून हजारो रुग्णांचे प्राण वाचवले. मात्र, या तुलनेत समोरून शशिकांत शिंदे उठावदार काम करू शकले नाहीत, हे सर्वश्रुत झाले. या काळात महेश शिंदे यांचे कौतुक झाले. त्यानंतर अचानक राजकीय उलथापालथ झाली. त्यात महेश शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटचे आमदार बनले. त्यानंतर त्यांनी आपले संघटन मजबूत करण्यास सुरुवात केली. कोरेगाव नगरपंचायत, तसेच देगाव, खेडसारख्या काही मोठ्या ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. दुसऱ्या बाजूने शशिकांत शिंदे यांनीही अनेक ग्रामपंचायती लढवून ताब्यात घेतल्या. महेश शिंदे यांनी मतदारसंघामध्ये कोट्यवधींचा निधी मिळवत अनेक विकासकामे मार्गी लावली.
दुसऱ्या बाजूने शशिकांत शिंदे यांना पराभवानंतर लगेचच विधान परिषदेचे आमदारपद मिळूनही त्याचा त्यांना लाभ घेता आला नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सत्ताधारी सरकारच्या विरोधात असल्याने त्यांना विकासकामांसाठी निधी मिळवण्यात अडचणी येत होत्या. तरीही त्यांनी जनसंपर्क ठेवून ती पोकळी भरून काढायला हवी होती. मात्र, त्यांचा जनसंपर्क कमी झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांत नैराश्य निर्माण झाल्याचे दिसून येत होते. नाही म्हणायला त्यांनी कोरेगाव शहरातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर जोरदार आवाज उठवून नगरपंचायतीमधील सत्ताधाऱ्यांना जाब विचारला.
बहुचर्चित कोरेगाव शहर प्रारूप विकास आराखड्यात जनतेची बाजू घेतली. बरेच जिव्हाळ्याचे प्रश्न विधान परिषदेत उपस्थित करून जोरदार आवाज उठवला. खटाव व सातारा तालुक्यातील काही गावांतील पुनर्वसन शिक्के उठवणे आदी विषयही मार्गी लावले. या त्यांच्या जमेच्या बाजू होत्या. राजकीय घडामोडीत तालुक्यात मजबूत असलेली राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली. मात्र, त्यातील बहुतांश राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर राहिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्यासोबत गेलेले थोडे फार कार्यकर्तेही शशिकांत शिंदे यांच्याबरोबरच राहिले. अशा त्यांच्या जमेच्या बाजू असताना विधानसभा निवडणूक लागली.
प्रत्यक्ष निवडणुकीत महेश शिंदे यांच्याकडे हजारो कोटींची केलेली विकासकामे, मोठा जनसंपर्क, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, शेतकरी वीजपंपांना मोफत वीज, महिलांना एसटीमध्ये अर्धे तिकीट आदी मुद्दे होते. त्यावर त्यांनी निवडणूक लढवली, तर शशिकांत शिंदे यांच्याकडे पाच वर्षांपूर्वीच्या दहा वर्षांतील आमदारकीच्या आणि जलसंपदामंत्रिपदाच्या काळात केलेली विकासकामे होती. मागील सुमारे साडेतीन वर्षे मिळालेल्या विधान परिषद आमदारकीच्या काळात केलेली विकासकामे, विधान परिषदेत आवाज उठवून मार्गी लावलेले प्रश्न आणि तालुक्यात असलेले राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचे संघटन या जमेच्या बाजू होत्या. या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणूक मतदानातून जनतेने पुन्हा एकदा महेश शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले, तर शशिकांत शिंदे यांना पराभूत केले आहे.
प्रभावी फॅक्टर
मतदारसंघामध्ये कोट्यवधींची विकासकामे मार्गी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा
धोम धरणातून दोन टीएमसी जादा पाणी मंजूर
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून रुग्णांना कोट्यवधींची मदत