कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील परसराम धनाजी जावळे यांच्या घरासमोर चोरट्यांनी ३१ डिसेंबर रोजी रात्री १ वा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर चोरून नेला होता. या ट्रॅक्टरचा तपास करण्यासाठी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी तपास चक्रे फिरवली होती. दोन दिवसानंतर हा ट्रॅक्टर येवला तालुक्यातील वाईबोथी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे सापडला आहे.
हनुमान मंदिराच्या पाठीमागे मोठी लोक वस्ती असूनही या चोरट्यांनी ट्रॅक्टर अगदी अलगद चोरून नेला होता. याबाबत आमच्या प्रतिनिधीने ट्रॅक्टर चोरी गेल्याची बातमी प्रसिद्ध केली होती. याची दखल घेत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री चौधरी, महेश कुशारे, अनिश शेख, दहिफळे यांनी सोनेवाडीत येऊन ट्रॅक्टर कोणत्या दिशेने गेला या संदर्भात माहिती घेतली. पोलीस पाटील दगडू गुडघे, किशोर जावळे, तुषार जावळे यांनी त्यांना सहकार्य केले.
भर लोक वस्तीतून ट्रॅक्टर चोरी गेल्याने माहितीच्याच माणसाचा यामध्ये हात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. या संदर्भात पोलिसांकडून तपास सुरू आहे.
चोरी गेल्यानंतर दोन दिवसांनी येवला तालुक्यातील वाई बोथी येथे दोन तीन किलोमीटर अंतरावर ट्रॅक्टर बंद पडल्यामुळे संशयास्पद हालचाली करताना दोन-तीन व्यक्ती आढळून आल्याने हा ट्रॅक्टर चोरीचा असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले.गावचे पोलीस पाटील आहेर यांनी या संदर्भात येवला पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल बिन्नर यांना या संदर्भात माहिती दिली. बिन्नर यांनी ट्रॅक्टर असलेल्या शोरूमच्या नंबरावरून गॅरेज मालकाशी संपर्क साधला असता हा ट्रॅक्टर चोरीला गेला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलीस पाटील आहेर यांनी सोनेवाडीचे पोलीस पाटील दगू गुडघे यांच्याशी संपर्क करत ट्रॅक्टर मालकाला कळवले. ट्रॅक्टर सापडल्याने किशोर जावळे,तुषार जावळे , पोलीस पाटील दगू गुडघे ,श्री घोंगडे, शनेश्वर जावळे , रविंद्र जावळे आदींनी घटनास्थळी धाव घेत. ट्रॅक्टर आपलाच असल्याची खात्री करत ट्रॅक्टर सोनवडी येथे घेऊन आले.