पुसेसावळी : पुसेसावळी व परिसरातील शेतकऱ्यांसाठी भुरट्या चोऱ्यांचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या वीज मोटारीच्या केबल चोरीच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
गेल्या काही आठवड्यांत परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील वीज मोटारीच्या केबल चोरीच्या घटना घडल्या आहेत. शेतामध्ये पाणीपुरवठ्यासाठी या मोटारी अत्यंत महत्त्वाच्या असतात. मात्र, केबल चोरीला गेल्यास पंप बंद पडतो आणि पिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. शिवाय, पुन्हा नव्या केबलची व्यवस्था करणे ही मोठी आर्थिक जबाबदारी ठरत आहे.
या प्रकारांमध्ये आणखी एक चिंतेची बाब म्हणजे चोरी झाली तरी अनेक शेतकरी तक्रार देण्यास टाळाटाळ करत आहेत. काहींना पोलिस कारवाईतील दिरंगाईची भीती वाटते, तर काहींना चोरीचा तपास लागेल की नाही याची शंका असते. परिणामी, अनेक घटना पोलिसांच्या नोंदीत येतच नाहीत आणि चोरट्यांना अधिक प्रोत्साहन मिळते.
परिसरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, तसेच चोरीच्या घटनांमध्ये तात्काळ गुन्हे नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच, शेतकऱ्यांनीही पोलिसांत तक्रार दाखल करून या घटनांबाबत अधिक तत्परता दाखवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तांत्रिक यंत्रणा आणि स्थानिक पातळीवर उपाययोजना केल्यास या चोऱ्यांना आळा घालता येऊ शकतो. शक्य झाल्यास शेतकऱ्यांनी शेताच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, सुरक्षारक्षकांची व्यवस्था करावी किंवा शेतातील विजेच्या पंपांभोवती जाळ्या उभाराव्यात. तसेच, ग्रामस्तरावर एकत्र येऊन चोरीच्या घटना रोखण्यासाठी विशेष समित्या स्थापन केल्या आहेत