सातारा : साताऱ्यात झालेल्या गुंतवणूक शिखर परिषदेत विविध कंपन्यांशी ९१ करार झाले. यातून जिल्ह्यात आगामी काळात ३९५० कोटींची गुंतवणूक होणार असून, त्यातून सुमारे ९७५० युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे.
पुणे विभागीय औद्योगिक संचालनालय आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या वतीने हॉटेल फर्न येथे गुंतवणूक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या परिषदेमध्ये जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणुकीविषयी चर्चा करण्यात आली. या परिषदेला उद्योग विभागाचे पुणे विभागीय सहसंचालक एस. जी. रजपूत, प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, एमआयडीसीचे अमितकुमार सोडगे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उमेश दंडगव्हाळ, जिल्हा कामगार आयुक्त नितीन कवळे, मैत्रीच्या नोडल अधिकारी डॉ. प्रियदर्शिनी सोनार यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.
या परिषदेमध्ये धोरणात्मक निर्णय, गुंतवणूक संधी आणि राज्यातील औद्योगिक विकासावर चर्चा करण्यात आली. स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारांच्या आर्थिक क्षमतेवर भर देण्यात आला असून, त्यात महत्त्वपूर्ण गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीच्या उद्दिष्टांचा भर असल्याचे शैलेश रजपूत यांनी सांगितले. त्यांनी डीआयसी सातारा टीमचे १०० टक्के लक्ष्य पूर्ण केल्याबद्दल आणि राज्यातील सर्वोच्च टक्केवारी मंजुरी मिळवल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन उमेश दंडगव्हाळ यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. या वेळी प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण म्हणाले, ”जिल्ह्यात उद्योग गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण आहे.
पाणी, रस्ते, वीज यासह सर्व सोयीसुविधा औद्योगिक वसाहतींत आहेत. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेत जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला असून, त्याबद्दल जिल्हा उद्योग केंद्राचे आम्ही कौतुक करतो. शिखर परिषदेत ९१ उद्योजकांनी सातारा जिल्ह्यात उद्योग उभारणीबाबत जिल्हा उद्योग केंद्राशी करार केले. यातून ३९५० कोटींची गुंतवणूक आगामी काळात जिल्ह्यात होणार असून, त्यातून ९७५० रोजगार मिळणार आहे.”
करार करणाऱ्या प्रमुख कंपन्या
रिलायन्स रिन्युएबल्स प्रा. : १००० कोटींची गुंतवणूक, १००० रोजगार निर्मिती, इल्गिन ग्लोबल इंडिया : ५०० कोटी गुंतवणूक, १५० रोजगार निर्मिती. विडेशन टेक प्रा. : २५० कोटींची गुंतवणूक, १२०० रोजगार निर्मिती, ट्युब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया : २०० कोटींची गुंतवणूक, १७९ रोजगार संधी. डेलवल फ्लो कंट्रोल प्रा. : २०० कोटी गुंतवणूक, २५० रोजगार निर्मिती, शाश्वत पॅकेजिंग : २०० कोटी गुंतवणूक, ३५० रोजगार निर्मिती.