आसन व्यवस्था, निवारा शेड, माहिती कक्षाची वानवा; विद्यार्थ्यांचीही गैरसोय
पुसेगाव : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. सकाळपासूनच बाहेर फिरताना नागरिकांच्या घामाच्या धारा वाहत आहेत. वाढते तापमान नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असताना येथील बसस्थानकावर आसन व्यवस्था, निवारा शेड, पूर्ण वेळ माहिती कक्ष, पिण्याचे पाणी अशा अनेक सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
खटाव तालुका उत्तर विभागातील पुसेगाव हे मध्यवर्ती ठिकाण आहे. या गावात उत्तम शिक्षण व भौतिक सुविधा उपलब्ध असल्याने मोळ, डिस्कळ, ललगुण, बुध, नेर, वर्धनगड, विसापूर, खातगुण, निढळ या विभागातून शेकडो विद्यार्थी तसेच नागरिक पुसेगावला येत असतात. सध्या परीक्षांचा कालावधी सुरू असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची दररोज ये-जा सुरू झाली आहे, तसेच येथे भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री सेवागिरी महाराज देवस्थान असल्याने राज्यभरातील भाविकांची वर्दळ नेहमी सुरू असते.
मात्र, या बसस्थानकावर परिवहन महामंडळाच्या अधिकच्या सोयी नसल्याने विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होताना दिसून येते. परिणामी, कडक उन्हाच्या तीव्र झळा सोसत प्रवासी, वयोवृद्ध, महिला, विद्यार्थी यांना ताटकळत बसची वाट पाहावी लागते.
मुख्यतः विद्यार्थिनी कॉलेज सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी बस स्थानकावरती येतात,तेव्हा त्यांना बसण्याची सुविधाही परिवहन महामंडळाने केलेली नाही. वयोवृद्ध आणि अपंग प्रवासी तर बसण्याची सोय नसल्याने कित्येकदा त्रास सहन करताना दिसून येतात,तसेच गाड्यांचे वेळापत्रक निश्चित नसल्याने येईल त्या एसटीमध्ये बसण्यासाठी विद्यार्थिनी, वयोवृद्ध आणि अपंगांना खूप त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास येते.
एसटी हा ग्रामीण भागातील दळणवळणाचा कणा मानला जातो. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य परिवहन महामंडळाचे असले तरी दुर्दैवाने महामंडळाचे अधिकारी पुसेगाव येथील बसस्थानकास सुविधा उपलब्ध करून देण्यात अकार्यक्षम दिसत आहेत. त्यामुळे संबंधित विभागीय अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
नव्या थांब्यांवर अंधार, महिला असुरक्षित
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी वडूज आणि फलटण बाजूकडे जाणाऱ्या वाहनांचे थांबे काही दिवसांपूर्वी बदलले आहेत. मात्र, या नव्या थांब्यांवर पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने तसेच तेथे संध्याकाळच्या वेळी वर्दळ कमी असल्याने असुरक्षित वाटत असल्याची भावना महिला प्रवासी व्यक्त करत आहेत.
पहाटे चार ते रात्री दहा वाजेपर्यंत बससेवा सुरू असल्याने प्रवाशांची खूपच वर्दळ असते. मात्र, पुसेगाव बसस्थानकावर प्रवाशांना अनेक असुविधांचा सामना करावा लागत असल्याने प्रवाशांची गैरसोय होते.
– मदन जाधव, ग्रामस्थ पुसेगाव