[ad_1]
ग्रेग चॅपेल यांनी भारतीय संघावर आपले अधिकार लादण्याचा प्रयत्न केला आणि अखेर त्यांना प्रशिक्षकपद सोडावं लागलं. तर दुसरीकडे अनिल कुंबळे संघातील अल्फा मेल स्टारडम व्यवस्थित हाताळू शकला नाही. मात्र गौतम गंभीर पहिला असा प्रशिक्षक होण्याच्या तयारीत आहे ज्याच्याकडे कर्णधारापेक्षाही जास्त अधिकार असतील. भारतीय संघात अनेकदा खेळाडू आणि प्रशिक्षकांमध्ये वर्चस्वावरुन वाद झाला असून, याची अनेक उदाहरणं आहेत. बिशन सिंग बेदी, चॅपेल आणि कुंबळे चॅम्पिअन खेळाडू असतानाही प्रशिक्षक झाल्यावर आपण सेकंड गेअरमध्ये यावं हे त्यांच्या लक्षात आलं नाही. दुसरीकडे जॉन राईट, गॅरी क्रिस्टन आण रवी शास्त्री यांना मात्र याची कल्पना होती आणि त्यामुळेच ते यशस्वी झाले.
विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवीचंद्रन अश्विन यांच्या निवृत्तीनंतर आता भारतीय कसोटी क्रिकेट संघात एकही मेगास्टार खेळाडू राहिलेला नाही. यामुळे गंभीरला क्रिकेट बुद्धिबळाच्या पटलावर त्याची धोरणं आखण्यासाठी आणि त्यांचा अवलंब करण्यासाठी वेळ मिळाला आहे. बीसीसीआयमधील सूत्रांच्या माहितीनुसार, गंभीरच्या बकेट-लिस्टमध्ये काही उद्दिष्टं आहेत आणि यातील सर्वात मोठं उद्दिष्टं म्हणजे संघातील स्टार संस्कृती नष्ट करणं आहे.
“गौतम गंभीरचं युग आता सुरु झालं आहे. पुढील वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या आधी भारतीय संघात नवे चेहरे असावेत यावर गौतम गंभीर ठाम होता,” अशी बीसीसीआयमधील सूत्रांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर माहिती दिली आहे.
“निर्णय प्रक्रियेशी संबंधित असलेल्या प्रत्येकाला माहित होतं की सर्वात मोठ्या फॉरमॅटमध्ये वरिष्ठ खेळाडूंच्या बाबतीत गौतम गंभीरच्या मनात काय होतं. अर्थातच त्याचे आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरचे विचार जुळले आहेत,” असंही त्याने पुढे सांगितलं.
भारतीय क्रिकेटमध्ये, कर्णधार हा नेहमीच एक मध्यवर्ती व्यक्तिमत्व राहिला आहे. प्रशिक्षक कितीही मोठा असला तरी भारतीय कर्णधाराचं महत्त्व कमी झालं नाही. सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी, कोहली आणि रोहित शर्मा कर्णधार असताना त्यांचा शब्द अखेरचा होता. पण आता गंभीरच्या बाबतीत तसं होण्याची शक्यता नाही. आता संघात तो निःसंशयपणे सर्वात शक्तिशाली व्यक्ती आहे आणि शेवटचा निर्णय त्याच्याकडेच असेल.
राहुल द्रविड-रोहित शर्मा यांचा प्रवास तसा कोणत्याही वादाविना मैत्रीपूर्ण झाला. मात्र रोहित शर्मा-गौतम गंभीर यांची जोडी कधीही मैत्रीपूर्ण वाटली नाही. गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय संघातून मोठे खेळाडू मागोमाग बाहेर पडताना दिसले आहेत. मात्र अधिकार मिळाले की त्याच्यासोबत दुसरी बाजूही असते.
भारतीय क्रिकेटमध्ये बदल होण्याचा काळ सुरु असताना गंभीरला बीसीसीआयने त्याला योग्यरित्या सक्षम करावे अशी इच्छा होती जेणेकरून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आणि घरच्या मैदानावर न्यूझीलंड मालिकेसारखे अपयश पुन्हा येऊ नये. शुभमन गिलच्या स्वरुपात त्याच्याकडे नवा आणि तरुण कर्णधार असेल जो किमान प्रस्थापित होईपर्यंत त्याचं ऐकेल. गिल स्टार खेळाडू असला तरी अद्याप गंभीरच्या निर्णय आणि धोरणांवर प्रश्न उपस्थित करु शकेल इतका अनुभवी झालेला नाही.
भारतीय संघात सध्या जसप्रीत बुमराह एकमेव खेळाडू आहे, जो आपलं मत मांडू शकतो. पण त्याचा फिटनेस नेहमीच चिंतेचा विषय असल्याने नेतृत्व देण्यात अडचणी येतात. त्यामुळे, गंभीरकडे टी-20 संघाप्रमाणेच पुढेही अखंड ताकद असेल. पण रोहित आणि विराट अद्यापही एकदिवसीय संघात असून 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत खेळण्याची आशा बाळगत असल्याने तिथे त्याला सावधगिरीने पावलं टाकावी लागणार आहेत.
[ad_2]