17 जागांसाठी उद्या मतदान व मतमोजणी
पाटण/प्रतिनिधी (संजय कांबळे) :- पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी निवडणूकच चित्र स्पष्ट झाले असून एकूण १७ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत पारंपारिक प्रतिस्पर्धी देसाई- पाटणकर गटांत थेट लढत होणार आहे, सत्ताधारी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर ,जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांच्या पाटणकर गटाचे १७ व विरोधात राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई गटाचे १७ असे एकूण ३४ उमेदवार प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
आता १७ जागांसाठी निवडणूक होत असल्याने प्रत्यक्षात रिंगणात उतरलेल्या उमेदवारांमध्ये सत्ताधारी पाटणकर गटाकडून सोसायटी मतदारसंघात सर्वसाधारणसाठी दत्तात्रय कदम , झुंजार पाटील , सुभाष पाटील , चंद्रशेखर मोरे , अभिजीत जाधव , दादासो जगदाळे , अमरसिंह पाटील ,महिला प्रतिनिधीमधून रेखा पाटील , लतिका साळुंखे , इतर मागासवर्गीय उत्तम कदम , भटक्या विमुक्त जाती मधून जगन्नाथ शेळके , ग्रामपंचायत सर्वसाधारणमधून मोहनराव पाटील , सिताराम मोरे , अनुसूचित जाती उत्तम पवार , आर्थिकदृष्ट्या दुर्बल संदीप पाटील, अनुज्ञप्ती धारक व्यापारी व अडते प्रतिनिधी अरविंद पाटील , बाळासो महाजन असे उमेदवार निवडणूक रिंगणात असून हमाल व तोलारी प्रतिनिधीमधून सत्ताधारी पाटणकर गटाचे आनंदराव पवार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड स्पष्ट झाली आहे .यामुळे पाटणकर गटाचा विजयाचा श्रीगणेशा झाला आहे.
ना . देसाई गटाकडून सोसायटी मतदारसंघ सर्वसाधारणमधून संग्राम मोकाशी , मानसिंग कदम , विलास गोडांबे , राजेंद्र पाटील , सिताराम सूर्यवंशी , बाळकृष्ण पाटील , दादासो जाधव, महिला प्रतिनिधी वैशाली शिंदे , जयश्री पवार, इतर मागासवर्ग नितीन यादव ,भटक्या विमुक्त जाती धनाजी गुजर , ग्रामपंचायतमधून सर्वसाधारणसाठी जोतीराम काळे , समीर भोसले , अनुसूचित जाती सिद्धार्थ गायकवाड , आर्थिकदृष्ट्या दुर्बल सुधाकर देसाई , अनुज्ञप्ती धारक व अडते प्रतिनिधी अविनाश नाझरे , अरुण जाधव हे उमेदवार असून हमाल व तोलारी प्रतिनिधीमधून ना .देसाई गटाला उमेदवार उपलब्ध झाला नाही .
पाटण बाजार समितीसाठी १८ जागा निवडून द्यायच्या असून सोसायटी मतदारसंघातून सर्वसाधारण ७ ,महिला प्रतिनिधी २ , इतर मागासवर्गीय १ ,भटक्या व विमुक्त जाती १ अशा ११ जागांसाठी १३२५ मतदान असून त्यासाठी २२ उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायत सदस्यांमधून सर्वसाधारण २ , अनुसूचित जाती जमाती १ , आर्थिक दृष्ट्या दुर्बल १ अशा ४ जागांसाठी १८९८ मतदान असून यासाठी ८ उमेदवार रिंगणात आहेत . अनुज्ञप्ती धारक व्यापारी व अडते प्रतिनिधी मधून २ सदस्यांसाठी ४ उमेदवार रिंगणात असून त्यासाठी १०३७ मतदान आहे . हमाल व तोलारी प्रतिनिधीमधून सत्ताधारी पाटणकर गटाचा एकमेव आनंदराव पवार यांचाच उमेदवारी अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड स्पष्ट झाली आहे. बाजार समितीसाठी एकूण ४२६० मतदार आहेत .रविवार दि.३० एप्रिल रोजी सकाळी सात ते दुपारी चार या वेळेत पाटण येथे मतदान व त्यानंतर त्याचदिवशी सायंकाळी पाटण येथेच मतमोजणी होणार आहे .