सातारा/अनिल वीर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी भारतीय समाजाला समतेचा विचार दिला. प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक सुधारणा करून त्यांनी नवभारताची पायाभरणी केली. महाराजांमुळेच बहुजन समाजाला सामाजिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य प्राप्त झाले. असे प्रतिपादन इतिहासाचे अभ्यासक प्रो. डॉ. संजीव बोडखे यांनी केले.
येथील रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात इतिहास आणि सांस्कृतिक विभागाच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात डॉ.बोडखे बोलत होते.अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या ऑडिट विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे होते.यावेळी उपप्राचार्य प्रो. डॉ. एस.एस. पवार, हिंदी विभाग प्रमुख प्रो. डॉ. जी.एस. भोसले, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयक डॉ. जयश्री आफळे व सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रकाश टोणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ.मेनकुदळे म्हणाले , “रयत शिक्षण संस्थेच्या आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणास्थानांपैकी लोकराजे राजर्षी शाहू महाराज एक होते. शाहू महाराजांच्या समतावादी विचारांच्या प्रभावातच कर्मवीर भाऊराव पाटील यांची जडणघडण झाली. त्यांचे विचार आणि कार्याचा मोठा प्रभाव कर्मवीर अण्णांवर होता. त्यामुळेच रयत शिक्षण संस्थेच्या पहिल्या वस्तीगृहाचे नाव शाहू बोर्डिंग असे देण्यात आले.” डॉ. टोणे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा. निरंजन फरांदे यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. गजानन खामकर यांनी केले.