विवेकवादाने माणूस समृध्द होतो

0

र्मनिरपेक्ष पुरोगामी विज्ञानवादी विचार मांडण्याऱ्या विचारवंतांन्ना विचार मांडतांना मुस्कटदाबी, झुंडशाहीचा सामना करावा लागतो, हे खेदाने म्हणावे लागते. कारण आजही साहित्यिाकांवर सातत्याने हल्ले होत आहेत. अभिव्यक्ती, स्वातंत्र्य धोक्यात आले आहे, असे म्हणणे वागवे ठरणार नाही. आजचा काळ ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा काळ, अशा काळात अंधश्रध्दा गाडुन टाकावी आणि आपलं कर्तव्यकर्म अत्यंत विश्वासाने करीत राहावं, बेदरकारपणे. कारण “माणसाला अंधश्रध्दा दैववादी बनविते आणि दैववाद हा घातक असतो”. विवेकवाद जोपासतांना मन:स्ताप सहन करावा लागतो पण ते कठीण मात्र नक्किच नाही. यासाठी प्रत्येकानेच एकविसाव्या शतकात वाटचाल करतांना विज्ञानाचा आधार घेवून विवेकवादाचा पुरस्कार करायला हवा. कारण विवेकवादाने माणूस समृध्द होतो आणि सत्यापर्यंतही पोचतो. विवेकी विचार करतांना बंडखोर व्हावे लागते. पण त्याला प्रतिसादही मिळतो. थोडा त्रागा सहन करावा लागतो, एवढेच.

2500 वर्षापूर्वी तथागत सिध्दार्थ गौतमांनी विज्ञानावर आधारीत धम्म सांगतांना “मी तो सांगतो म्हणुन स्विकारा असे कधीच म्हटले नाही. उलट तुमच्या विचाराला पटेल तरच स्विकारा असे म्हणुन विवेकबुध्दीला आवाहन केले. बौध्दधम्म हा चिकित्सेनंतर सांगितलेला आहे. रोगनिदानानंतर दिलेले औषध आहे. भगवंतानी प्रथम मानवजातीच्या रोगाचे निदान केले. जगात दु:ख व दारिद्रय हे महाभयंकर रोग आहेत. हे या चिकित्सेनंतर शोधलेले उत्तर होय. यालाच बौध्दधम्माचे अधिष्ठान म्हणता येईल. आता प्रश्न उपस्थित होतो की, दु:ख व दारिद्रय हे रोग कोणता धर्म नाहीसा करेल ? जो धर्म हे दु:ख व दारिद्रय  नाहीसे करण्याचा प्रभावी आणि परिणामकारक मार्ग दाखवू शकत नाही. तो धर्मच होवू शकत नाही. कारण धर्म हा समाजधारणेसाठी आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे.

व्यक्ती स्वातंत्र्यावरती हल्ला करणे हे लोकशाहीला अभिप्रेत नाही.  संवैधानिक लोकशाहीमध्ये तर त्या स्वातंत्र्याचा आदरच केलेला आहे. तरी देखील प्रत्येक व्यक्तीला आपले विचार व्यक्त करण्याचे, आपला विचार निर्भिडपणे, अभ्यासपूर्ण पध्दतीने मांडण्याचे स्वातंत्र्य भारतीय संविधानाने प्रत्येकाला दिलेले आहे. माणूस मारून विचार संपवता येत नाहीत, उलट ते अधिक प्रमाणात फोफावत जातात. डॉ. दाभोळकरांच्या मारेकऱ्यांचा अद्याप पत्ता नाही, अकरा वर्ष झालीत तरी शासन शोध कार्यास विलंब किंवा कुचराई करते, शासन मारेकऱ्यांना पाठीशी घालत तर नाही नाही ? असा अनाकलनीय प्रश्न निर्माण होतो, असे समजायला हरकत नाही.

जगात जे जे वैज्ञानिक होवून गेलेत त्यांनी ग्रंथ व शब्दप्रामाण्यवाद नाकारला. त्यामुळेच आपली पिढी सत्यापर्यंत पोहोचू शकली. सत्य जाणून घेण्याच्या एका विशिष्ट भूमिकेतून प्रत्येक माणसाने विचार केला तर विवेकवादी म्हणून जगता येणे शक्य आहे. पण त्यासाठी समाजाच्या निर्माण केलेल्या चौकटी तोडण्याचे धाडस आपल्यात असणे आवश्यक आहे. काही रुढी परंपरांतूनआपली सुटका झाली असे आपल्याला वाटत असले तरीही त्या बाबी समाजात पुन्हा डोंक वर काढु शकतात कारण त्या तात्पुरत्या असतात. त्यामुळेच सातत्याने विवेकवादाचा पुरस्कार करणे आवश्यक ठरते. रुढी परंपरेला खतपाणी घालण्यापेक्षा त्याला मुठमाती देणे तितेकेच गरजेचे आहे. समाजातील अनिष्ट प्रथांवर पुराणमतवादावर अंधश्रध्दांवर प्रहार करुन समाजात विवेकवादाची पेरणी  करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, “साधनाकार” डॉ. नरेन्द्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश या या चारही विचारवंतांना मारण्यासाठी बुरसट आणि एकाच विचारधारेचे लोक आहेत यात शंकाच नाही.

अंधश्रध्दा निर्मुलन चळवळीला आयुष्यभर विवेकवादाची पाठराखन करणाऱ्या डॉ. दाभोळकरांची हत्या हा मोठा धक्का होता. विचारांची लढाई विचारानेच करण्याची परंपरा असलेल्या आणि पुरोगामीचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात असे घडणे अस्वस्थ करणारे होते. महात्मा फुले, छत्रपती शाहु महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची मशागत झालेल्या महाराष्ट्रान्ने अनेक वैचारिक लढे आणि चळवळी पाहिल्या आहेत.

आपल्या विरोधकांना संपविण्याची परंपरा महाराष्ट्रात नाही. ही स्थिती कां निर्माण झाली याची सर्वांनीच अंतर्मुख होवून विचार करण्याची गरज आहे. मात्र सत्तेचे राजकारण करणाऱ्या कोणालाच तसे करण्याची गरज वाटत नाही. उलट मतपेढयांसाठी प्रतिगामी शक्तींना चुचकारण्याचे राजकारण केले आहे. परिणामी सामाजिक स्वास्थ्य हरवत असुन अनिष्ट प्रथा परंपराकडे जातीय आणि धार्मिक चष्म्यातून पाहिले जात आहे. आपल्या एखाद्या मुद्याला विरोध करणारा शत्रुच असल्याची प्रवृत्ती वाढत आहे. दाभोळकर, पानसरे यांच्या हत्येमागे हीच प्रवृत्ती आणि विकृती आहे. विवेाकाने विचार करणे, आपल्या विरोधकालाही त्याचे विचार व्यक्त करण्याची संधी देणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य राखणे, विज्ञानाच्या कसोटयांवर तपासुन पाहणे हे सारे हरवू लागले की काय असा प्रश्न त्यामुळे पडतो. दुर्देव असे आहे की हे सारे कळत असुनही समाज, राजकिय पक्ष डोळयावर झापडं बांधुन त्याच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

महाराष्ट्र भर तथा महाराष्ट्राबाहेर ही फिरतांना अशिक्षित, अर्धशिक्षित व उच्चशिक्षित समाज श्रध्देच्या नावाखाली अंधश्रध्देला बळी पडतो आहे व त्यामुळे त्याचे ऐच्छिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक नुकसान होत आहे, याची जाणीव डॉ. नरेन्द्र दाभोळकर यांना झाली होती, म्हणुनच या बाबी संविधानाच्या तत्वान्ने कायद्याचा आग्रह धरीत थांबविण्याचा आग्रही प्रयत्न्न त्यांनी केला होता. या प्रयत्न्नाच्या जवळपास अंतिम टप्प्यावर ते असतांना त्यांची जाणीवपूर्वक हत्या करण्यात आली.

विज्ञानाच्या कसोटीवर आपल्या श्रध्दा तपासुन घेत वाटचाल करण्यासाठी आवश्यक असलेल्या चर्चेचं व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याची खरी गरज आहे. याच संदर्भात राजश्री शाहु महाराजांनी तर अंधश्रध्देवर कडाडुन हल्ला चढवत म्हटले होते की, अंधश्रध्दा हा मनुष्याच्या प्रगतीतील अडथळा असुन धार्मिक रुढी आणि प्रथांमुळे मनुष्य आपलं मनुष्यत्व गमावतो आणि पशुप्रमाणे वर्तन करु लागतो. ईश्वरावर श्रध्दा ठेवून अंधश्रध्दा टाळता येते, हे ही निक्षुण सांगितले.

एकविसाव्या शतकात आपण विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आधारे मोठी प्रगती साधत असतांना विज्ञानाचा पाया असलेलं तर्कसुत्र विसरलो, तर विनाश अटळ आहे. अशा या काळात आपण वैज्ञानिक दृष्टिकोणाचा अंगीकार करण्यासाठी प्रयत्न करणे याचं अनन्यसाधारण महत्व आहे. वैज्ञानिक दृष्टिकोण ? विज्ञान आपल्याला प्रश्न विचाराला शिकवतं. तर्क आणि अनुभवाच्या आधारे गोष्टींवर विश्वास ठेवायला शिकवतं. विज्ञान सांगतं-अंतिम काहीच नसतं, तर्काच्या कसोटीवर जे उतरेल ते सत्य. म्हणुनच विज्ञानात नवनवीन शोध व प्रगती होत राहते. मुळात विचार कसा करावा, तर्काचा अवलंब कसा करावा आणि निष्कर्षाप्रत येतांना काय दक्षता घ्यावी, या सत्याबाबत विज्ञान दिशादर्शक ठरते आणि नेमकं हेच डॉ. नरेन्द्र दाभोळकरांच्या “ठरलं डोळस व्हायचंय” या पुस्तकात सत्यनारायण ची पुजा ही एक अंधश्रध्दा आहे, असा बेडरपणे उल्लेख केला आहे. हे सर्व थोतांड आहे. समाजाच्या मानगुटीवर भूत पिशाच्च दोलायमान होत आहे. तेव्हा त्या पाशातून बाहेर निघण्यासाठी विवेकाची कास धरायला हवी. विवेकी वागण्याची मोठी किंमत चुकवावी लागते हे टाहो फोडून सांगत असतांनाच त्यांचा घात झाला. कारण हेच नको होतं त्या करंटयांना, पण आता तरी विवेकवाद जोपासण्याची समाजाला अत्यंत आवश्यकता आहे. सदविवेकबुध्दीने सारासार विचार करुन विवेकी विचार आत्मसात करण्याची गरज आहे. समाजातील प्रत्येकांनी वैफल्यग्रस्त न राहता विज्ञाननिष्ठ बनले पाहिजेत, ही काळाची आहे.

एखादे कर्मकांड तर्काला पटत नाही म्हणून ते करु नये असे बुध्दिला वाटते, पण परंपरेने चालत आल्यामुळे ते केलेच पाहिजे असा भावनेचा हट्ट असतो. अशी तर्कविहीन मानसिकता म्हणजे श्रध्दा. श्रध्दा आणि अंधश्रध्दा यात तत्वत: भेद नाही पण ज्या श्रध्देपायी माणसाची लक्षणीय प्रमाणात अधिक हानी होते त्या श्रध्देला अंधश्रध्दा म्हणता येईल. याचाच उलगडा डॉ. दाभोळकर करीत असत पण त्याचा विप्रर्यास गेला गेला आणि त्यांना प्राणास मुकावे लागले, माथेफिरुने असा घात केला. स्वतंत्र्य विचार करण्याची प्रवृती वाढली पाहिजे कारण परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे, त्यामुळे विज्ञाननिष्ठ, तर्कनिष्ठ बनण्याची गरज आहे.

प्रभाकर सोमकुवर

नागपूर

दुरध्वनी क्र : 9595255952

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here