दोन आरोपींना पकडल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.
काही अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांचा मृत्यू झाला. वांद्र्यातील झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाच्या बाहेर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. बाबा सिद्दिकी हे गेली तीन ते चार दशकं राजकारणात सक्रिय होते. राजकीय आयुष्यातील बहुतांश काळ ते काँग्रेस पक्षात होते. काही महिन्यांपूर्वीच ते अजित पवारांच्या गटात गेले होते. तसेच. हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांशी त्यांचे जवळचे संबंध होते. त्यामुळे सुद्धा ते चर्चेत असत. बाबा सिद्दिकी यांनी काही महिन्यांपूर्वीच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला होता.
दोन आरोपी पकडले-मुख्यमंत्री
बाबा सिद्दिकी यांच्यावरील हल्ल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. “बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाल्याची ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. या हल्ल्यासंदर्भात तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी दिलेले आहेत. दोन आरोपी पकडण्यात आले आहेत. एक हरियाणाचा आहे आणि एक उत्तर प्रदेशचा आहे. तिसरा आरोपी फरार आहे. त्याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. त्यालाही लवकरच अटक केली जाईल,” असं शिंदे म्हणाले.
कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी-शरद पवार
राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाचे प्रमुख शरद पवार यांनी यासंदर्भात ‘एक्स’वर ट्विट करत राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो.”