सराईत गुन्हेगाराकडून देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे जप्त

0

शिरवळ : येथील पंढरपूर फाटा याठिकाणी लोणंद रस्त्यावर शिरवळ पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे असा ६५ हजार ९५० रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली. सुरज उर्फ टायगर चिंग्या संतोष खुंटे (वय-२३ वर्षे, रा. अंदोरी, जि.सातारा) असे आरोपीचे नाव आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत. दरम्यान, शिरवळचे पोलिस निरीक्षक संदिप जगताप यांना एक युवक संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तात्काळ एक पथक घटनास्थळी पाठवत संबंधीत युवकाला ताब्यात घेत अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतुस असा एकूण ६५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल सापडला.

याप्रकरणी सुरज उर्फ टायगर चिंग्या संतोष खुंटे याच्यावर पोलीस अंमलदार मंगेश मोझर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, खुटे याला खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावत सातारा येथील कारागृहात रवानगी केली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक संदिप जगताप, परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक सपना दांगट, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय धुमाळ, पोलीस अंमलदार जितेंद्र शिंदे, सचिन वीर, नितीन नलावडे, मंगेश मोझर यांनी केली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नयना कामथे या करीत आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here