पुसेगाव : श्री सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत, देवस्थान ट्रस्ट, पोलीस, समाजातील दानशूर व्यक्ती आणि व्यापारी यांच्या माध्यमातून सेवागिरी महाराजांची पुसेगाव, ता. खटाव ही सुवर्णनगरी आजपासून सीसीटीव्हीच्या कक्षेत आली आहे.
पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी सांगितले की, पोलीस ठाण्याच्या सलोखा सभागृहात याबाबत पंधरा दिवसांपूर्वी चर्चा झाली होती. त्यावेळी ट्रस्ट, ग्रामपंचायत, व्यापारी व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून गावातील मुख्य बाजारपेठ, अंतर्गत रस्ते, विविध चौक आणि दवाखान्यांसारख्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी (दि. 31 डिसेंबर) गावातील विविध ठिकाणी 20 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
मुख्य बाजारपेठेत बर्याच ठिकाणी आधीपासूनच सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यात आता वाढ झाल्याने बर्याच गोष्टींना आळा बसणार आहे. याचे प्रक्षेपण थेट पोलीस ठाण्यातच होणार असल्याने अनेक घटना, गुन्हे, चोरी, वाहतूक कोंडी घडल्यास त्याचा तात्काळ सोक्षमोक्ष लावता येणार आहे.
देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन डॉ. सुरेश जाधव, माजी चेअरमन रणधीर जाधव, संतोष वाघ, सपोनि संदीप पोमण, सरपंच घनश्याम मसणे, उपसरपंच विशाल जाधव, बाळासाहेब जाधव, शिवाजीराव लाटे, बाळासाहेब जाधव, प्रवीण जाधव यांच्या हस्ते या यंत्रणेचा लोकार्पण सोहळा झाला. यावेळी सहाय्यक फौजदार दीपक बर्गे, उपनिरीक्षक सुधाकर भोसले, चंद्रहार खाडे, पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.