डांबर चोरांची आंतरराज्य टोळी गजाआड ; तीन संशयितांस अटक, १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

0

कराड : डांबर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले. याप्रकरणी राजेश जसवंत सिंग (वय ४०), विजयपाल उमेद सिंग (वय २९, दोघेही रा. भुटोली, ता.निमकथाना, जि. सिक्कर, राजस्थान), प्रतीक अशोक बोरकर (वय २५, रा. एकोडी, ता. वारासोणी, जि. बालाघाट, मध्य प्रदेश) व आदम दादाहयात (शेख ४२, रा. चेंबूर मुंबई) यांना अटक केली आहे. संबंधितांकडून चार टन डांबर, टँकर असा १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
          

पोलिसांची माहिती अशी सुर्ली (ता. कऱ्हाड) येथून लिनोफ डांबर बॅचमिक्स कंपनीच्या डांबर प्लँटमधून शुक्रवारी रात्रीच्या सुमारास राजस्थान व मध्य प्रदेशातील कामगार डांबर चोरी करताना सुरक्षारक्षकाला दिसले. त्याने आरडाओरडा केल्याने त्या कामगारांनी दोन लाख रुपये किमतीचे चार टन डांबर व टँकर असा मुद्देमाल चोरून नेला.
याबाबत उदय जाधव (रा. सैदापूर, ता. कऱ्हाड) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, तालुका पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेला तपासाच्या सूचना दिल्या.
दरम्यान, पोलिस निरीक्षक जगताप यांना चोरी करणारे परप्रांतीय कामगार हे त्यांच्या मूळगावी पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक अमित बाबर, पोलिस उपनिरीक्षक अभिजित चौधरी, गुन्हे प्रकटीकरणचे पोलिस हवालदार नितीन येळवे, उत्तम कोळी, सज्जन जगताप, सचिन निकम, किरण बामणे, मोहित गुरव, प्रफुल्ल गाडे, सुजित दाभाडे, संजय जाधव यांनी सुर्ली भागात सापळा रचून तेथून राजेश सिंग, विजयपाल सिंग, प्रतीक बोरकर या तिघांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता चोरलेले डांबर हे आदम शेख हा टँकरमधून मुंबईकडे घेऊन गेल्याची माहिती मिळाली. त्याला पोलिसांनी चेंबूर येथून अटक केली. त्याच्याकडे चोरीचे दोन लाख रुपये किमतीचे चार टन डांबर व १५ लाख रुपये किमतीचा टँकर असा १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. हवालदार सचिन निकम तपास करत आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here