महाबळेश्वर नगरपालिकेच्या आवारात झाड कोसळून दोन गाड्यांचे नुकसान; 

0
IMG-20250530-WA0042.jpg

सुदैवाने जीवितहानी टळली..

महाबळेश्वर | प्रतिनिधी : महाबळेश्वरमध्ये मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे महाबळेश्वर नगरपालिकेच्या आवारात मोठ्या झाडाचे कोसळणे या घटनेने खळबळ उडवली आहे. या झाडामुळे आवारात उभ्या असलेल्या दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नगरपालिकेच्या आवारात उभ्या असलेल्या ब्रीझा (एमएच १२ एसई ४४४९) आणि कपास जीप (एमएच ११ डीएन २१२४) या दोन गाड्यांवर झाड कोसळले. जोरदार वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे ही दुर्घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर नगरपालिकेचे वृक्ष अधिकारी हिरवे आणि त्यांच्या टीमने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी झाडाचे फांद्या कापून गाड्या झाडाखालून बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे बचावकार्य अडथळ्यांत सापडले.

या प्रसंगी महाबळेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक योगेश पाटील यांनी स्वयं निगराणी ठेवून कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाडाखाली अडकलेल्या गाड्या यशस्वीरित्या बाहेर काढण्यात पालिका यशस्वी ठरली. सध्या पावसाचे प्रमाण लक्षात घेता, अशा घटनांपासून बचावासाठी महाबळेश्वर नगरपालिका सज्ज असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. नागरिकांनी अशा हवामानात वाहने सुरक्षित स्थळी उभी करावीत, असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here