विजय ढालपे,गोंदवले : माण तालुक्यातील पळशी येथे दारूबंदीसह अवैध धंद्यांवर बंदी आणण्याच्या अनुषंगाने महिलांची विशेष ग्रामसभा घेतली. पळशी गावच्या इतिहासात पहिल्यांदाच दारूबंदीसाठी महिला मोठ्या संख्येने एकवटल्या.
या ग्रामसभेत दारू, गुटखा, मटका, जुगार या अवैध धंद्यांवर बंदीचा ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामसभेमध्ये बोलताना आक्रमक होत महिला भावनाविवश झाल्या होत्या. यापुढे गावात अवैध दारू विक्री करू दिली जाणार नसल्याचा इशारा उपस्थित महिलांनी दिला.
पळशी गावचा विस्तार मोठा असून, घराघरांत नोकरदार वर्ग असल्याचे पाहायला मिळते. सर्वच क्षेत्रात गावचा नावलौकिक चांगला आहे; मात्र कित्येक वर्षांपासून हातभट्टी, देशी विदेशी दारूची विक्री या गावात राजरोसपणे सुरू आहे. या दारू विक्रीतून अनेक कुटुंब व तरुण पिढ्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. अनेकांना जीव गमवावा लागला आहे तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्वाला सामोरे जावे लागले आहे.
संपूर्ण गावात दारुबंदी करण्यासाठी गेल्या आठवड्यापासून सरपंच शांताबाई खाडे, उपसरपंच केशेव खाडे-मुगदे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व महिलांनी पुढाकार घेत महिलांच्या विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. सोमवारी सकाळी हनुमान मंदिरात गावासह वाड्या वस्तीवरील महिलांनी बहुसंख्येने हजेरी लावली. या ग्रामसभेत महिलांनी आपल्या तिखट प्रतिक्रिया व्यक्त करत दारुबंदीचा सूर आळवला. ‘दारूबंदी झालीच पाहिजे, दारूबंदी कायमस्वरूपी झालीच पाहिजे’ या घोषणा देत दारूबंदीचा ठराव मंजूर करण्यात आला.
यापुढे गावात दारू विक्री केली जाणार नाही. तसेच अवैध व्यवसाय चालू देणार नसल्याची आक्रमक भूमिका महिलांनी मांडली. दारूबंदीसाठी महिलांची कमिटी स्थापन करण्यात येईल, ग्रामपंचायत व कमिटीच्या माध्यमातून अवैध व्यवसायांवर आळा घालण्यात येईल, त्याला पायबंद घालून पुन्हा अवैध व्यवसाय सुरू केल्यास पोलिसांच्या मदतीने कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा महिलांनी या ग्रामसभेत दिला.
यावेळी ग्रामविस्तार अधिकारी शरद जाधव यांनी ठराव मंजूर करण्यात आला असल्याचे जाहीर केले. म्हसवड पोलिस ठाण्याचे सपोनि अक्षय सोनवणे यांनी मार्गदर्शन करत यापुढे अवैध व्यवसाय सुरु राहिल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी म्हसवड पोलिस ठाण्याचे देवा खाडे, अभिजित भादुले, जगन्नाथ लुबाळ, सरपंच शांताबाई खाडे, उपसरपंच केशव खाडे-मुगदे, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. तर जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. राजेंद्र खाडे यांनी या ग्रामसभेचे यशस्वी नियोजन केले. डॉ. शशिकांत डोईफोडे, ग्रामपंचायत सदस्या फुलाबाई साबळे, हभप नारायण गंबरे, नामदेव वनवे यांनी मनोगत व्यक्त केले.