रामवाडी सरपंचासह ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश
पाचगणी : रामवाडी (ता. जावळी) येथील ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच इतर चार सदस्यांनी पालकमंत्री शंभूराजे देसाई यांचे हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाला जबरदस्त धक्का बसला आहे.
रामवाडी तालुका जावळी हे गाव बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे होते. त्यांच्या विचारांचीच गावात ग्रामपंचायत सत्ता होती. परंतु, गावातील अंतर्गत धुसफूस, मतभेद टोकाला गेल्याने सरपंच श्रीरंग रामचंद्र गलगले यांचेसह ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय बाबुराव पोफळे, वासंती दिलीप पाडळे, श्रद्धा किसन पाडळे, अनिता अनिल गलगले यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते या सदस्यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. यावेळी सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शरद कणसे, सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, उपजिल्हा प्रमुख संदीप पवार, तालुका प्रमुख सातारा रोहित कटके, तालुका प्रमुख जावली समीर गोळे, शहरप्रमुख मेढा संजय सुर्वे, सोशल मीडिया प्रमुख लालसिंग शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रामवाडी ग्रामपंचायत ही शिवसेना गटाची झाली असून, सातारा-जावळीचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. एकंदर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून विकासात्मक वाटचाल रामवाडी गावची अलबेलपणे चालू असताना अचानकपणे सरपंच श्रीरंग गलगले यांनी टोकाचे पाऊल उचलत पक्ष बदल का केला याची चर्चा सर्वत्र चालू आहे