गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध उपक्रम राबविणार
सातारा : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाची सूत्रे आज अनिस नायकवडी यांनी हाती घेतली, तसेच शिक्षणाधिकारी (योजना) या विभागाचाही पदभार शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी स्वीकारला.
या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे आदी उपस्थित होते.
नायकवडी म्हणाले, ”विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध उपक्रम राबविणार आहे. आदर्श शाळा उपक्रमात मोठी क्रांती होत असून, जिल्हा परिषद शाळांचा दर्जा व गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. जिल्हा परिषद शाळांकडे विद्यार्थी व पालकांचा कल वाढविण्यासाठी काम करणार आहे. जिल्ह्याच्या परंपरेला साजेसे काम करून शिक्षण विभागाचा नावलौकिक वाढविणार आहे.” या वेळी नूतन शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी व तत्कालिन शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांचा शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.