प्रतापगड : रस्ता रुंदीकरणाच्या कामावेळी योग्य त्या उपाययोजना न केल्याने अंबेनळी घाटात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर दरड कोसळू लागल्या आहेत. कोसळलेली दरड व रस्त्यावर आलेला राडारोडा हटवण्याच्या कामासाठी अंबेनळी घाट पुढील चार ते पाच दिवसांसाठी बंद केला आहे.
याबाबतचे आदेश तहसीलदार सचिन मस्के यांनी काढले आहे. ऐन विकेंडच्या दरम्यान अंबेनळी घाट वाहतुकीसाठी बंद केल्याने कोकणमार्गे महाबळेश्वरला येणार्या पर्यटकांची गैरसोय होणार आहे.
सुरूर ते पोलादपूर यादरम्यान हॅम योजनेतून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. पोलादपूरपासून महाबळेश्वर-पर्यंत अंबेनळी घाट आहे. या घाटात डोंगराच्या बाजूने रस्ता रूंदीकरणासाठी माती व दगड काढण्याचे काम सुरू आहे. हे काम करताना संबंधित ठेकेदाराने माती व दगड काढतानावरून दरड कोसळणार या बाबींचा विचार न करताच काम केले आहे. कामाचे योग्य नियोजन न केल्याने घाटात पोलादपूर विभागाकडील भागात अनेक वेळा दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे यादरम्यानच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
गुरूवारी अंबेनळी घाटात रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असताना दरड कोसळली. यामुळे डोंगरावरील माती व दगड घाटातील रस्त्यावर आले. ही दरड व रस्त्यावरील राडारोडा हटवण्यासाठी चार ते पाच दिवस लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारीसाठी सचिन म्हस्के यांनी अंबेनळी घाट वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अंबनेळी घाटातून प्रवास करणार्या वाहनांना याचा फटका बसणार आहे. प्रवासी व पर्यटकांना पुढील चार ते पाच दिवस पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.