सातारा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. शिष्यवृत्ती परीक्षेच्या राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत सातार्याचा डंका वाजला आहे.
पाचवीचे 35 व आठवीचे 23 असे मिळून 58 विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत चमकले. तर जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत 947 विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी), पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) रविवार, दि. 9 फेब्रुवारी 2025 रोजी सातार्यातील 242 परीक्षा केंद्रांवर झाली. पाचवीसाठी 20 हजार 162 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 6 हजार 128 विद्यार्थी पात्र झाले असून त्याची टक्केवारी 30.70 टक्के आहे. आठवीच्या 12 हजार 832 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 3 हजार 533 विद्यार्थी पात्र झाले असून त्याची टक्केवारी 27.88 टक्के आहे.
राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत पाचवीमध्ये वाई तालुक्यातील वाई नगरपालिका शाळा क्रमांक पाचचा विद्यार्थी आरव विक्रम तांबे याने शहरी विभागात राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक पटकावला तर याच शाळेची विद्यार्थींनी प्रिशा सॅम्युअल गावित हिने पाचवा क्रमांक पटकावला. आठवीमध्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री विद्यालय वाईच्या वेंदात राहूल घोडकेने शहरी विभागात राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक पटकावला. द्रविड हायस्कूल वाईच्या आदित्य विक्रम तांबेने राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत तिसरा क्रमांक पटकावला.
शिरवळ, ता. खंडाळा येथील ज्ञानसंवर्धिनी माध्यमिक विद्यालयाचा संस्कार योगेश बोबडे याने ग्रामीण विभागात राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत चौथा क्रमांक पटकावला. सातार्यातील अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्या जान्हवी सचिन जाधव हिने राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक पटकावला. तर रहिमतपूर ता. कोरेगाव येथील आदर्श विद्यालयाच्या जिया अकबर आत्तारने राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक पटकावला.
राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत पाचवी ग्रामीणमध्ये 13 व शहरी 22 असे मिळून 35 व आठवी ग्रामीणमध्ये 10 व शहरी 13 असे मिळून 23 विद्यार्थ्यांनी स्थान पटकावले. जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत पाचवी व आठवीमध्ये जावली 34, कराड 137, खंडाळा 89, खटाव 136, कोरेगाव 108, महाबळेश्वर 8, माण 55, पाटण 46, फलटण 76, सातारा 155, वाई 103 असे मिळून 947 विद्यार्थ्यांनी स्थान पटकावले. यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, प्रभावती कोळेकर, अनिस नायकवडी, धनंजय चोपडे यांनी अभिनंदन केले.
-अनिस नायकवडी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे अभिनंदन करत असून मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2025-26 मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये भरघोस यश मिळावे. त्यासाठी पाचवी व आठवीच्या वर्ग शिक्षकांचे जिल्हास्तरावर दोन मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले जाणार आहे.