देवळाली प्रवरा /प्रतिनिधी :
राहुरी तालुक्यातील मांजरी बस स्टॅन्ड परिसरात वंचित बहुजन आघाडीच्या शाखा उद्घाटन प्रसंगी दोन गटात धुमचक्री झाली असुन या प्रकरणी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दोन्ही गटाची बाजू समजावून घेत परस्परविरोधी फिर्याद दाखल करुन राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
राहुरी पोलीस ठाण्यात मांजरी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सुरेश लहानु डोंगरे यांनी फिर्याद दाखल करताना सांगितले की, रविवारी दुपारी मांजरी गावातील एस.टी स्टॅन्ड परिसरात वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य संघटना शाखा मांजरी यांनी कुठलीही परवानगी न घेता शाखा उद्घाटनाचे फलक लावून ग्रामपंचायत कार्यालयावर दगड फेक करून ग्रामपंचायत कार्यालयाच्या खिडकीच्या काचा फोडून १५०० रुपयांचे किमंतीचे नुकसान केले आहे.
या प्रकरणी संदीप भीमराज बर्डे, एकलव्य संघटना तालुकाध्यक्ष, बाळासाहेब राघू गोलवड, भाग्यश्री संदीप बर्डे (रा. मांजरी, ता. राहुरी) यांच्याविरुद्ध सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदा कलम ३ व सार्वजनिक मालमत्ता नुकसान कायदा कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर भाग्यश्री बर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की, रविवारी दुपारी मांजरी गावात एकलव्य संघटना व वंचित बहुजन आघाडीची बैठक सुरु असताना बाबू अण्णासाहेब विटनोर, सागर बाबुराब विटनोर, भाऊसाहेब तुकाराम विटमोर, अण्णासाहेब विटनोर, राहुल पोपट विटनोर, मिठु अण्णासाहेब विटनोर, प्रमोद भाऊसाहेब विटनोर, बाळू पोपट विटनोर, ऋतिक रावसाहेब बाचकर(सर्व रा. मांजरी) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत तुम्ही इथे बैठक ठेवली तर तुम्हा गावात राहु देणार नाही अशी धमकी दिली. याप्रकरणी राहुरी पोलीसठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्या असुन दोन्ही गटाच्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास पोलीस करीत आहे.