अपत्य प्राप्तीच्या आमिषाने महिलेला दीड लाखांना गंडा; धुळे, जळगावातील तिघांवर गुन्हा

0

सातारा : अपत्य प्राप्तीचे आमिष दाखवून एका महिलेला तब्बल दीड लाखांना गंडा घालण्यात आला असून, याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात धुळे, जळगाव येथील तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

राहुल धरमगिरी गोसावी (वय ३२), शैलेश सुरेश गोसावी (वय २२, रा. तिरंगानगर साक्री, ता. साक्री, जि. धुळे), अश्विन अशोक गोसावी(वय ;३४, रा. गोसावीवस्ती, वैद्यवाडी, हडपसर पुणे, मूळ रा. वाकोत, ता. जामनेर, जळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, वरील संशयितांकडे कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नाही, असे असतानाही हे लोक ज्या लोकांना मूल होत नाही, अशा लोकांची माहिती घेऊन त्यांच्यासोबत संपर्क साधत होते. त्यांनी अशाच प्रकारे सातारा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३४ वर्षीय महिलेशी संपर्क साधला. त्यानंतर वरील संशयित हे त्या महिलेच्या घरी आले.

यावेळी त्यांनी स्वत:कडील काही औषधे त्या महिलेला दिली. तसेच सातारा शहरातील एका एजन्सीचे नाव सांगून तेथील औषधे आणण्यासाठी असे सर्व पैसे मिळून १ लाख ४९ हजार ५०० रुपये त्यांनी ऑनलाइन घेतले. त्यानंतर संशयित तिघे तेथून निघून गेले. या तिघांवर कऱ्हाड येथील तळबीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित पीडित महिलेनेही शनिवारी सातारा तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. हवालदार पिसाळ हे अधिक तपास करीत आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here