सातारा दि. 18, – पालखी मार्गावरील समस्या तसेच अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व संबंधित विभागांनी प्राधान्य द्यावे अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात जिल्हाधिकारी डूडी यांनी आषाढी वारी व पालखी मार्ग याविषयी आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, वाई – खंडाळाचे प्रांताधिकारी, फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले, भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संतोष रोकडे, पोलीस उपअधिक्षक के. एन. पाटील, खंडाळा तहसिलदार अजित पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, फलटणचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोरडे, खंडाळाचे गटविकास अधिकारी अनिल वाघमारे, लोणंदचे मुख्याधिकारी दत्तात्रेय गायकवाड, नगर प्रशासनचे प्रशासकीय अधिकारी सचिन सणस, श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाजचे अध्यक्ष भाऊसाहेब मनोहरबुवा गोसावी, उपाध्यक्ष भाऊ महाराज फुरसुंगीकर, सचिव मारुती कोकाटे, ॲड. विकास ढगे पाटील, आळंदी मंदिरचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, यांच्यासह देवाची आळंदी येथील मानकरी व वारकरी उपस्थित होते.
पालखी तळाच्या ठिकाणासाठीच्या नवीन जागांसाठीचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देऊन जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, ज्याठिकाणी जागा उपलब्ध नाहीत तेथे सर्वेक्षण करावे. मे पर्यंत रस्त्यांची व पुलांची कामे पूर्ण करावीत. लोणंद येथे पूल रूंदीकरण करावे. लोणंद, फलटण, वाखरी येथे तळाची जागा वाढवण्यासाठीचे प्रस्ताव तयार करावेत. शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी वॉटर एटीएम बसवण्याविषयी सर्वेक्षण व्हावे. पालखी मार्गावर दोन्ही बाजूने वृक्षारोपण करावे. तात्पुरत्या कचरा कुंड्या उभाराव्यात. तर शहरीभागामध्ये संबंधित नगर पालिकांनी कायमस्वरुपी कचरा कुंड्या उभा कराव्यात. विसाव्याच्या ठिकाणी चांगली सावली देणारी झाडे लावावीत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने रस्त्याबाबत येणाऱ्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्या स्तरावर काम करावे. पालखी मार्गावर स्वच्छता राहील यासाठी ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी नियोजन करावे असेही जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी सांगितले.
पालखी काळात येणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्यावर आतापासूनच उपाययोजना करण्याचा प्रशासनाचा मानस असून त्यासाठीच बैठकीमध्ये समस्या जाणून घेत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, सोहळा समिती, वारकरी संप्रदाय यांनीही प्रशासनाच्या या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा. सर्वांनी मिळून वारी स्वच्छ, सुंदर, आरोग्यदायी व आनंदी वातावरणात पार पडेल यासाठी काम करुया.
यावेळी सोहळा समितीचे पदाधिकारी, वारकरी यांनी वारी सोहळ्यात येणाऱ्या समस्यांची माहिती दिली. यासर्व समस्यांवर तातडीने कार्यावारी सुरू करून याविषयी दर महा बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिल्या.