सोलापूर : महाविकास आघाडीकडून माढा लोकसभा मतदारसंघासाठी महादेव जानकर यांची उमेदवारी निश्चित झाली होती. माढ्यातून निवडणूक लढविणार असल्याचे जानकरांनीही स्पष्ट केले हाेते. मात्र, अचानक सूत्रं फिरली आणि महादेव जानकर यांनीही ‘यू टर्न’ घेतला.
माढ्याचे सामाजिक समीकरण बघता जानकरांची उमेदवारी महायुतीसाठी जड ठरली असती. मात्र, फडणवीसांनी बाजू पलटावत शरद पवारांकडे झुकलेल्या जानकरांना महायुतीकडे वळविले आणि मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या कोट्यातूनच त्यांची उमेदवारी जाहीर केली. म्हणजेच भाजपने निंबाळरांच्या वाटेत येणाऱ्या जानकरांना बाजूला केले. मात्र, त्यासाठी मित्रपक्षाचा वापर केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मोहिते पाटील यांच्या बंडामुळे माढा लोकसभा मतदारसंघ भाजपसाठी अगोदरच डोकेदुखी ठरला आहे. भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली खरी, पण त्याचक्षणी मोहिते पाटील यांनी बंडाचे निशाण फडकावले. भाजप निंबाळकर यांच्या उमेदवारीवर ठाम आहे, तर मोहिते पाटील हे माढ्यातून निवडणूक लढविण्याच्या निर्णयावरून माघार घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे भाजपसाठी माढ्याचा तिढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
एकीकडे मोहिते पाटील बंडखोरीवर ठाम असताना महाविकास आघाडीकडून माढ्यातून महादेव जानकर यांची उमेदवारी जाहीर होत होती. जानकर यांनी शरद पवार यांना भेटून त्यासंदर्भात चर्चाही केली होती. मात्र, जानकर-पवार युती ही महायुतीसाठी बारामती, माढ्यात डोकेदुखी ठरली असती, त्यामुळे या युतीची घोषणा होण्यापूर्वीच महायुतीकडू ऑपरेशन करण्यात आले. जानकर यांनी यू टर्न घेत आपण महायुतीसोबत असल्याचे जाहीर केले.
जानकर यांची उमेदवारी माढ्यात भाजपसाठी धोक्याची घंटा ठरली असती. जानकरांचे गाव याच मतदारसंघात येते, त्यांच्या पक्षाची संघटनात्मक बांधणीही याच मतदारसंघात आहे. शिवाय, शरद पवारांविषयी असलेली सहानुभूतीही जानकर यांच्या कामी आली असती. त्याचा धसका महायुतीने घेतला आहे. जानकर यांना आपल्याकडे वळवून भाजपने माढ्यातील मोठा अडसर दूर केला आहे, तर राष्ट्रवादीला बारामतीतही जानकरांच्या उमेदवारीचा फटका बसू शकला असता, त्यामुळे निवडणुका जाहीर झाल्यानंतरही त्यांच्याकडे ढुंकूणही न पाहणाऱ्या महायुतीने जानकर यांच्यासाठी एक जागाही सोडली.
महादेव जानकर यांना परभणीची जागा सोडल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केली. म्हणजे निंबाळकरांच्या वाटेतील अडसर दूर केला. त्याची किंमत राष्ट्रवादीला द्यावी लागली आहे. कारण बारामतीची भीती त्यांना दाखवण्यात येत आहे. त्यामुळेच अजित पवारांकडूनही कोणतीही खळखळ न करताना परभणीची जागा सोडण्यात आली आहे. भाजपने माढ्यातील निंबाळकरांच्या वाटेतील अडथळे दूर केले. मात्र, त्यासाठी मित्रपक्षाच्या काठीचा वापर केला.
Home महाराष्ट्र भाजपने राष्ट्रवादीच्या खांद्यावर बंदूक ठेवून निंबाळकरांच्या वाटेतील माढ्यातील अडसर दूर केला…