नवीन वर्षाची सुरूवात होते आणि पुरोगामी महाराष्ट्राला प्रतिगामी विचारांचं स्फुरण चढतं. अर्थात महापुरूषांची जयंती साजरी करताना महापुरुषांच्या विचारांनाच मूठमाती दिली जाते. तसंही आता प्रत्येक जातीने आपआपले महापुरूष निवडून घेतले असल्यामुळे सोयीने ही मंडळी आपआपले झेंडे घेऊन मिरवताना दिसतात.
जातीभेद, अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रीशिक्षणाला विरोध अशा एक ना अनेक अनिष्ट रूढी परंपरांविरोधात महात्म्यांनी दिलेला लढा महाराष्ट्राने याचि देहि याचि डोळा पाहिला आहे. भारतात हजारो वर्षापासून अस्तित्वात असलेली अन्यायिक जातीव्यवस्था दूर करून समता प्रस्थापित करण्यासाठी महापुरूषांनी जो संघर्ष केला, यासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं, महाराष्ट्राला पुरोगामित्व बहाल केलं, त्यांचा तोच संघर्ष जयंती आणि उत्सवांच्या नावाखाली कुठंतरी सोयीस्कररित्या मागे पडत चालल्यासारखं वाटतंय.
माणसाला आदर्शांचे अनुकरण करायला आवडते. त्यामुळे महापुरूषांच्या जयंती, स्मृतीदिन साजरे होऊन त्यांच्या विचारांना, त्यांच्या कार्याला उजाळा मिळायला हवा याबाबत दुमत नाही. परंतु माणूस म्हणून जन्माला येऊन आयुष्यभर मानवी हिताचा, उत्कर्षाचा विचार करणार्या महामानवांचं दैवतीकरण करणं हे कितपत योग्य आहे? महामानव बोधीसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करताना महापुरूषांचं होणारं दैवतीकरण हे मानवी हितासाठी घातक आहे याचा ऊहापोह होणं गरजेचं आहे.
मागच्या दोन तीन दिवसांत महाडवरून भीमज्योत आणायला जाणार्या तथाकथित कार्यकर्त्यांचे सोशल मीडीयावर दर्शन झाले. ज्या बाबासाहेबांनी १८-१८ तास अभ्यास करून स्वतः शिक्षणाने समृद्ध होऊन समाजाला दिशा देण्याचे कार्य केले, अशी कृत्ये करून त्यांच्या विचारांना आपणच हरताळ फासतोय याची जाणीव या पिढीला करून देणं गरजेचं आहे. नाचणारा नाही तर वाचणारा समाज बाबासाहेबांना अभिप्रेत होता. बाबासाहेबांना पुतळ्यांमध्ये, प्रतिकांमध्ये न शोधता पुस्तकांमध्ये आणि विचारांमध्ये शोधले तर नक्कीच ते सापडतील.
चित्रपटांमधून इतिहास बिघडवण्याचं, परिणामी वर्तमान दूषित आणि भविष्य अंधकारमय करण्याचं फॅड सध्या शिखरावर आहे. पुस्तकं सोडून, ऐतिहासिक तथ्य वाचून, ती सर्वांगाने तपासून पाहण्याऐवजी मोबाईल आणि सोशल मीडियातून इतिहास समजणारी सो कॉल्ड विचारवंत तरूण पिढी चित्रपटातील कल्पनाविश्वाला इतिहास समजून तशी व्यक्त होत आहे ही बाब धक्कादायक आणि तरुणांचं भविष्य अंधकारमय करणारी ठरेल यात शंका नाही. ज्या उद्देशाने बाबासाहेब आणि अन्य समाजसुधारकांनी जातीअंताचा लढा दिला, त्या विचारांचं आणि कार्याचं विस्मरण होऊन तरूण पिढीला भरकटवण्याचं काम सध्या अशा चित्रपटांमधून आणि समाजातील काही घटकांकडून जोमाने सुरू आहे.
समाजातील प्रत्येक घटक हा मी कुठल्या जातीचा,माझ्या जातीतला कोणता महापुरूष आणि तोच कसा सर्वश्रेष्ठ याची जणू स्पर्धाच लागलेली दिसत आहे. पण ज्या समाजसुधारकांनी, महापुरूषांनी आयुष्यभर गुलामगिरीविरोधात लढा दिला, समाजहिताचे कार्य केले, त्यांनाच आपण जातीच्या कोंदणात बांधून त्यांच्या तत्वांचा खुलेआम लिलाव करत आहोत. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण करायचा असेल तर त्याची सुरूवात स्वतःपासून करावी लागेल.”शिका,संघटित व्हा ,संघर्ष करा !”” हे तत्व अंगीकारावे लागेल.
बाबासाहेब म्हणत, ज्यांना स्वतःचा इतिहास माहित नाही, ते खरा इतिहास निर्माण करु शकत नाहीत”, पण सद्यस्थितीला या विधानाचा विपर्यास आपल्याला समाजात होताना दिसून येत आहे. प्रत्येकजण भ्रमयुगातल्या इतिहासात जगताना दिसतोय. अमुक एक इतिहासातली ही ही व्यक्तीरेखा माझ्या जातीची आणि त्यामुळे मी सर्वश्रेष्ठ ही भावना समाजात रूजत चालली आहे. महापुरूषांच्या कार्याचा मूळ हेतू बाजूला पडत चालला आहे. चला तर आजच्या भीमजयंतीदिनी कल्पना विश्वातील भ्रामक चित्रपट, मोबाईल आणि सोशल मीडियातून डोकं वर काढून, बाबासाहेबांच्या नावाने भीमज्योत पेटवून अन्यायग्रस्त रूढी परंपरांना पुनरुज्जीवित करण्यापेक्षा महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित आणि त्यांना अपेक्षित ज्ञानाची ज्योत पेटवूयात आणि खर्या अर्थाने बाबासाहेबांना आदरांजली वाहूयात!!
लेखिका-स्वाती लोंढे-चव्हाण
