चक्रीच्या अड्ड्यांवर कारवाईचा धडाका;पोलिस अधीक्षक तुषार दोशी अॅक्शन माेडवर

0

सातारा : सातारा शहराला वेढा घालून अनेक युवकांना कंगाल करणाऱ्या चक्री जुगार अड्ड्याबाबत गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षकांनी या अड्ड्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शहर व शाहूपुरी पोलिसांनी आज तीन चक्री जुगार अड्ड्यांवर कारवाई केली आहे. चक्री जुगार अड्ड्यांचा शहराला वेढा पडला असल्याबाबत पोलिसांनी काही अड्ड्यांवर कारवाया केल्या; परंतु तीन- चार दिवसांत हे अड्डे पुन्हा सुरू झाले. त्यामुळे पोलिसांच्या कारवायांचा अड्डाचालकांवर काहीच फरक पडत नसल्याचे चित्र होते. पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर  या अड्ड्यांवर कडक कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती.

अधीक्षक दोशी यांनी पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना या अड्ड्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहर व शाहूपुरी पोलिसांनी कारवाया सुरू केल्या आहेत. करंजे नाका परिसरात केलेल्या कारवाईप्रकरणी जयदीप पोपटराव यादव (वय ४२, रा. वाढे, ता. सातारा) याच्यावर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्‍याच्याकडून २० हजार २०० रुपये किमतीचा कॉम्प्युटर, जुगाराचे साहित्‍य, रोख रक्‍कम असा मुद्देमाल जप्‍त केला आहे. हवालदार अमित झेंडे व पथकाने ही कारवाई केली.

दुसरी कारवाई राजवाडा परिसरात नगर वाचनालय परिसरात करण्यात आली. याप्रकरणी निखिल नामदेव सपकाळ (वय २८, रा. करंजे) याच्यावर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्‍याच्याकडून २१ हजार रुपये किमतीचे जुगाराचे साहित्‍य, कॉम्प्युटर, रोख रक्‍कम असा मुद्देमाल जप्‍त केला आहे. हवालदार वैभव सावंत व पथकाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे.

तिसरी कारवाई अजंठा चौक परिसरात करण्यात आली. याप्रकरणी अविनाश सदाशिव साठे (वय ३०, रा. सदरबझार) याच्यावर सातारा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्‍याच्याकडून २५ हजार २०० रुपयांचे साहित्‍य जप्‍त केले. यामध्ये जुगाराचे साहित्‍य, सीपीयू, की बोर्ड, माउस, रोख रक्‍कम याचा समावेश आहे. हवालदार अमित झेंडे व पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली अवैध धंद्यावर अशाचप्रकारे कारवाई होणे अपेक्षित आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here