[ad_1]
जीममध्ये अनेकदा तरुण, तरुणींकडून वॉर्म अप न करता थेट व्यायाम करण्यास सुरुवात करतात. पण यामुळे आपण आपल्या शरिराला धोका निर्माण होऊ शकतो. एका महिलेवर अतिदक्षता विभागात दाखल होण्याची वेळ आली आहे. 24 वर्षीय तरुणीला जिममध्ये जास्त काम केल्याने झालेल्या जीवघेण्या आजारामुळे रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे. या तरुणीला रॅबडोमायोलिसिस झाल्याचं निदान झालं आहे. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये जास्त व्यायाम केल्याने स्नायू मरतात, तुटतात आणि रक्तात विषारी पदार्थांची गळती होते.
डॉक्टरांच्या मते, रक्तातील विषारी पदार्थांमुळे किडनीचं कायमस्वरुपी नुकसान होऊ शकतं. मूत्रपिंड निष्क्रिय होण्याचा धोका असतो. जर लवकर उपचार केले नाहीत तर ही जीवघेणी स्थिती आहे. स्पिनिंग ही उच्च-तीव्रतेची इनडोअर सायकलिंग असते जी सहसा मांड्या आणि नितंबांमधील मोठ्या स्नायूंना लक्ष्य करते. कॅलरी बर्न आणि सहनशक्ती वाढवण्यासाठी हे खूप लोकप्रिय असले तरी, नव्याने व्यायाम सुरु करणाऱ्यांसाठी धोका निर्माण करणारं असतं.
“डिहायड्रेशन, फिटनेसचा अभाव आणि क्वाड्रिसेप्सच्या मसल मासमुळे एकत्रितपणे पहिल्या स्पिनिंग सत्रानंतर रॅबडोमायोलिसिस होण्याची शक्यता जास्त असते,” असंही त्यांनी पुढे सांगितलं आहे.
फक्त दोन दिवसांत तरुणीला असह्य वेदना
जीम सुरू केल्यानंतर फक्त दोनच दिवसांत महिलेला वरच्या मजल्यावर चढताना त्रास होत होता. तिला तिच्या मांड्यांमध्ये प्रचंड वेदना होत होत्या, ज्या असामान्यपणे तीव्र होत्या असं तिने सांगितलं. तिच्या लघवीचा रंगही बदलला होता. ज्यामुळे काहीतरी गंभीर घडल्याचं कळत होतं. यानंतर ती नंतर रुग्णालयात गेली, जिथे चाचण्यांमध्ये तिच्या क्रिएटिन काइनेजची पातळी – स्नायूंच्या नुकसानाचे चिन्हक – सामान्य मर्यादेपेक्षा 50 पट जास्त असल्याचे दिसून आलं. तिच्या मांड्यांमधील स्नायू पेशी फुटल्या होत्या, ज्यामुळे तिच्या रक्तात मायोग्लोबिनसारखे हानिकारक पदार्थ बाहेर पडले होते. याचा तिच्या मूत्रपिंडांवर गंभीर ताण पडला होता.
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी तिला ताबडतोब सलाईन लावण्यात आली होती. डॉक्टरांनी तिच्या मूत्रपिंडाच्या कार्याचे बारकाईने निरीक्षण केले जेणेकरून ते निकामी होऊ नये. पाच दिवसांच्या उपचारानंतर, तिच्या स्नायूंच्या एंजाइमची पातळी अखेर कमी झाली आणि तिचं मूत्रपिंड चांगल्या पद्धतीने काम करु लागलं.
व्यायामाआधी वॉर्म अप करणं महत्त्वाचं का असतं?
डॉक्टर सांगतात की, जर तुम्ही नव्याने व्यायाम सुरु करत असाल तर हळूहळू आणि कमी तीव्रतेने करा. प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी पुरेसे हायड्रेशन, वॉर्म-अप आणि स्ट्रेचिंग आणि नंतर कूल-डाऊनसह प्रशिक्षण सुरू करा.
व्यायामापूर्वी वॉर्म अप करणं अत्यंत महत्वाचे आहे कारण त्यामुळे शरिराला पुढील हालचालींची तयार करतं. तसंच दुखापतीचा धोका कमी होते आणि कार्यक्षमता सुधारते. ते रक्त प्रवाह, शरीराचे तापमान वाढवते णि लवचिकता वाढवतं, ज्यामुळे तुमचे स्नायू अधिक लवचिक आणि परिश्रमासाठी तयार होतात.
[ad_2]