महाबळेश्वर तालुक्यात शैक्षणिक वाटचालीला हातभार
महाबळेश्वर प्रतिनिधी : महाबळेश्वर तालुक्यातील ११३ जिल्हा परिषद शाळांमधील एकूण २४८६ विद्यार्थ्यांना ‘उर्मी’ सामाजिक संस्थेच्या वतीने ‘हिसोवा इलेक्ट्रॉनिक्स प्रा.लि. विवो पुणे’ यांच्या सहकार्याने रेनकोटचे वाटप करण्यात आले. भेकवली व मेटगुताड येथे प्रातिनिधिक स्वरूपात हा वितरण सोहळा पार पडला. अतिवृष्टीसाठी परिचित असलेल्या या तालुक्यात विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे ही मदत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या प्रसंगी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, उर्मी सामाजिक संस्थेचे समन्वयक राहुल शेंडे तसेच त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
भेकवली येथे ‘धरती आबा’ जनभागीदारी अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी, महाबळेश्वर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाचे सुरू असलेले काम कौतुकास्पद असल्याचे म्हटले. ते पुढे म्हणाले की, दुर्गम भागातील विद्यार्थी उत्तम प्रकारे ज्ञान संपादन करत असून, यासाठी पालक, शिक्षक आणि उर्मीसारख्या सामाजिक संस्थांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन केले.
गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये ‘शिकणे’ प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये आणि त्यांचे अध्ययन अधिक सुकर व्हावे, या उदात्त हेतूने तालुक्यातील सर्वच विद्यार्थ्यांना विवो व उर्मी संस्थेच्या माध्यमातून झालेली ही मदत खूप मोलाची आहे.” या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना रेनकोटसोबत पाण्याची बाटली, पुस्तके, गणवेश आणि लेखन साहित्य यांचेही वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास शिक्षण विस्तार अधिकारी सुरेंद्र भिलारे, केंद्रप्रमुख दगडू ढेबे, संजय पारठे, नामदेव धनावडे, चंद्रकांत जंगम, विनायक पवार, जयराज जाधव, सुहास कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष शिक्षक अभिजीत खामकर, सचिन चव्हाण, कुलदीप अहिवळे, श्रीनिधी जोशी, पूनम घुगे, रमेश सरक, श्रीगणेश शेंडे आणि उमेश भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व उपस्थितांचे स्वागत दगडू ढेबे यांनी केले तर आभार सुरेंद्र भिलारे यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.