जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे जामखेडकडे दुर्लक्ष
जामखेड तालुका प्रतिनिधी :
जामखेड तालुक्यात स्वस्त धान्याचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरु असून गोरगरिबांना देण्यात येणारे धान्य ‘महसूल’ मधील काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने थेट शहरातील काही दुकानदारांना पोहच केले जात असल्याचे चित्र तालुक्यात आहे. पुरवठा अधिकाऱ्याचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. जामखेड तालुक्यात रेशनच्या स्वस्त धान्याचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरु आहे. मागे दोन तीन महिन्यापूर्वीच काळ्याबाजारात जाणारा रेशनचे धान्य तहसीलदारांच्या पथकाने पकडले होते. त्यानंतर हा प्रकार सुरूच असून याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होताना दिसत आहे. जामखेड येथील पुरवठा विभागात अधिकृत कर्मचारी कमी व खाजगी कर्मचाऱ्यांचा रुबाब वाढला आहे. यामुळे खालच्या अधिकाऱ्यांनी आपली पोळी भाजून घेण्यास सुरुवात केली आहे. तालुका पुरवठा विभागाच्या आशीर्वादाने ‘तेरीभी चूप मेरीभी चूप असा प्रकारचं खुले आम होत असतानाही जिल्हा पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांही मलिंदा देऊन गप्प केले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे . मात्र यामुळे गरिबांचे धान्य माफियांच्या पोटात जात असल्याचे प्रकार चालू आहेत.
त्यातच ‘ई-पॉस’ मशिन बसविण्यात आल्यानंतरही स्वस्त धान्य घोटाळा समोर आला आहे. रेशनच्या काळ्या बाजारात राजकीय पक्षाचे पदाधिकारीही गुंतल्याचाही आरोप होतोय. अधिकारी यासंदर्भात उघडपणे बोलण्यास नकार देत आहेत.
राजकीय वरदहस्त असल्यामुळे तहसीलदार व पुरवठा अधिकारी कारवाईकडे कानाडोळा करत आहेत. मात्र या सगळ्या प्रकारात लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. शासकीय पोती बदलून दुसऱ्या पोत्यामध्ये गहू व तांदूळ काळ्याबाजारात जात आहे. धान्याचा काळाबाजार करणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्यातच ‘ शासकीय स्वस्त धान्य दुकानामार्फत अंतोदय, बीपीएल व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना तांदूळ व गव्हाचे वितरण स्वस्त दरात करण्यात येते. मात्र स्वस्त दुकानातून घेतलेले धान्य रेशन कार्डधारकही चक्क व्यापाऱ्याला विकून मोकळे होत असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी कारवाई करण्याचं सोडून प्रशासन पाठिशी घालत असल्याचा आरोप होतोय. सदर कारवाई झाल्यानंतर संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे; मात्र तसे होताना दिसत नाही. अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. तसेच शहर व ग्रामीण भागातील व्यापारी लाभार्थ्यांकडून खरेदी केलेले रेशनचे धान्य शहरातील मोठ्या व्यापाऱ्यांना विक्री करीत असल्याने या गोरखधंद्यात लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे.