सातारा : महाराष्ट्रात आपल्या संस्थानात मराठा समाजातील लोकांसहित सर्व मागासवर्गीयांसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवणारे महात्मा जोतीराव फुल्यांचे खरेखुरे वैचारिक वारसदार म्हणजे राजर्षी शाहू आरक्षणाचे जनक ठरले.असे प्रतिपादन बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक तथा राजर्षी शाहु सन्मान पुरस्कार विजेते अनिल वीर यांनी केले.
राजर्षी शाहूंची १५१ वी जयंती लुम्बिनी बुद्ध विहार शाक्य नगरी खेड,ता.सातारा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.तेव्हा अध्यक्षस्थानावरून अनिल वीर मार्गदर्शन करीत होते.यावेळी साहित्यिक सुरेश मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती.
बहुजन समाजासाठी शिक्षणाचा प्रसार, सोबत बहुजनांच्या आर्थिक प्रगतीसाठी उद्योगधंदे तसेच धरणाची निर्मिती करणारे आणि प्रजेची पितृवत काळजी घेणाऱ्या महानायक म्हणुन छ. शाहु महाराज यांचे कार्य अजरामर राहणार आहे.त्यांनी स्वतः बाबासाहेबांची भेट घेऊन सत्कार करून म्हणाले,”आम्ही संस्थांचे राजे तर तुम्ही ज्ञानाचे राजे आहात.” याशिवाय,मानगावच्या परिषदेत दलित-बहुजनांच्या उद्धारासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरच पुढारी आहेत.असेही भाकीत त्यांनी केले होते.सर्वच क्षेत्रात त्यांनी अलौकीत असे कार्य केले होते.राजर्षी शाहु, छ. शिवराय व सजाजीराव गायकवाड यांनी राजे म्हणुन न्याय दिला होता.तेव्हा देशाला बुद्ध,शाहु,फुले,आंबेडकर आदी महापुरुषांच्या विचाराशिवाय तरणोपाय नाही.”सातारा नगरीत छ. शाहु महाराज यांचा पुतळा होणे गरजेचे आहे. असाही पुनरुच्चार करीत, बुद्ध,संत तुकाराम,म.फुले,छ. शिवराय, छ. शाहु महाराज व डॉ.आंबेडकर यांच्या विचाधारेतील साम्य अनेक उदाहरणाने वीरसर यांनी स्पष्ट केले.ते पुढे म्हणाले, “छ.शाहू महाराज सत्तेवर येण्याआधी नोकरीतल्या सगळ्या वरच्या व महत्त्वाच्या जागा सधन उच्चवर्गीय लोकांनाच दिल्या जायच्या. महाराजांनी मात्र, खालच्या-अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांना मोठ्या पदाच्या नोकर्या द्यायला सुरूवात केली होती.”
सुरेश मुळीक म्हणाले,”राजर्षी शाहूंनी शेवटच्या घटकापर्यंत काम केले होते.त्यामुळेच सामाजिक न्याय बहुजनांना मिळाला.” राजर्षी शाहूंनी संकुचित विचारांवर अभ्यंकर यांनी विचारलेल्या प्रश्नांस उत्तर देताना म्हणाले,”छ.शाहु महाराजांनी आपला रथ घोड्यांच्या पागेकडे नेला. नोकराला म्हन्ले, “चंदी आन रं.” त्यानं आणलेले हरभरे महाराजांनी एका जाजमावर टाकले. त्याबरोबर हरभरे खायला सगळी घोडी पळत आली. जी दांडगी, तगडी होती, ती लहान, अशक्तांना मागं सारून पुढं घुसली. शिंगरं आन् म्हातारी मागं र्हायली. त्यांना खायला चंदी मिळालीच नाही. महाराज म्हन्ले, “बघितलंत का अभ्यंकर, जी चलाख, दांडगी आणि ‘लायक’ होती त्यांनीच समद्या चंदीचा फडशा पाडला. लहान, रोगी आनि अशक्त उपाशीच र्हायली का नाय? म्हणून मी चंदी तोबऱ्यात भरून त्यांना देतो. तसं चारल्याशिवाय ती सशक्त हुनारंच न्हाईत. मग मागासलेल्या अस्पृश्य समाजाला, तुमच्यासारख्यांच्या बरोबरीला आणायला काय करायला पायजे? खास सवलती नको का द्यायला? असा सवाल केला होता.असे उदाहरण देत सुरेश मुळीक यांनी अशा विचारांचा राजांचा राजा, लोकराजा सत्तेवर असताना गोरगरीबांना काय कमी पडणार होतं? अहो इतिहासात कधी झाली नसंल अशी क्रांती झाली.
माझ्या शाहूच्या राज्यात उच्चवर्गीयांच्या मांडीला मांडी लावून अस्पृश्य – बहुजनांतील मुलंमुली शिक्षण घ्यायला लागली फासेपारधी-मातंग-गारूडी समाजातल्या लोकांना राजदरबारी नोकर्या दिल्या गेल्या. त्यांना कामधंदे सुरू करायला शाहूराजांनी खिशातले पैसे दिले ! जातीभेदाची कीड नष्ट करायला आंतरजातीय विवाह लावले. विधवाविवाह-स्त्रियांना शिक्षण, त्यांचे सबलीकरण यावर भर दिला गेला ! कोवळ्या वयाच्या भिमरावामधनं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखं भारतरत्न घडवण्यात शाहूमहाराजांचा सिंहाचा वाटा होता ! “शाहू महाराजांची जयंती दिवाळीसारखी साजरी करा. ते सामाजिक लोकशाहीचे खरे आधारस्तंभ होते.” असे उद्गार बाबासाहेबांनी काढले, ते उगाच नाही.या देशातला समतेचा पाया भक्कम त्यांनी घातल्याने सर्व क्षेत्रात प्रगती आढळुन येत आहे.
विद्या कांबळे म्हणाल्या, “महापुरुष यांच्या विचारामुळे सर्वत्र समानता आढळुन येत आहे.तेव्हा युवक-युवतींनी शिक्षण घेऊन स्वतः व कुटुंब सांभाळून समाजासाठी योगदान दिले पाहिजे.”
प्रथमतः राजर्षी शाहूंच्या प्रतिमेस अनिल वीर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तद्नंतर दीपप्रज्वलन करून उपस्थितांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.बचत गटाच्या आशा कांबळे यांनी स्वागत केले.प्रवीण कांबळे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.राहुल कांबळे यांनी आभार मानले.सदरच्या कार्यक्रमास उपासक व उपासिका मोठ्या संख्येनी उपस्थीत होत्या.याकामी श्रीकांत मोरे,निशिकांत कांबळे,मनाली कांबळे,दिक्षा कांबळे, सुहानी कांबळे,लता कांबळे आदींनी अथक असे परिश्रम घेतले.