हृदयद्रावक घटना! विजेच्या धक्क्याने दोन वारकऱ्यांचा मृत्यू

0

बरड : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली असून, दोन वारकऱ्यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. रविवारी (२९ जून) रात्री ही घटना सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील बरड येथे घडली.
या घटनेमुळे पालखी सोहळ्यात सहभागी असलेल्या सर्वच वारकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

मृत्यू झालेल्या  वारकऱ्यांची नावे तुषार रामेश्वर बावनकुळे (वय २२, रा. खलासना, जिल्हा नागपूर) आणि मधुकरराव तुकाराम शेंडे (वय ५५, रा. मेडिकल चौक, नागपूर) अशी आहेत. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, फलटणचे पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांनी या घटनेची माहिती दिली.पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बरड येथे पालखी सोहळ्याचा रविवारी मुक्काम होता. रात्रीच्या सुमारास तुषार बावनकुळे हे कपडे वाळत घालण्यासाठी विजेच्या खांबाला दोरी बांधत होते. यावेळी त्यांना जोराचा विद्युत धक्का बसला. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात मधुकरराव शेंडेही पुढे सरसावले आणि त्यांनाही धक्का बसला. दोघेही घटनास्थळीच बेशुद्ध पडले.

तत्काळ त्यांना  नातेपुते येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, डॉक्टर नम्रता व्होरा यांनी उपचारापूर्वीच दोघेही मृत झाल्याचे घोषित केले.ही घटना वासुदेव महाराज टापरे यांच्या दिंडीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांवर घडली असून, हे दोघेही नागपूर जिल्ह्यातील विहिर तालुक्यातील रहिवासी होते. मधुकरराव शेंडे हे अविवाहित होते आणि वारकरी संप्रदायात अतिशय सक्रिय होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन वारकरी आणि सामाजिक कार्याला समर्पित केले होते. ते बावणे कुणबी समाज केंद्रीय संस्थेचे सदस्य होते आणि विविध सामाजिक संघटनांशी त्यांचे निकटचे संबंध होते.

वारी आता अंतिम टप्प्यात असून, पंढरपूरला काही अंतरावर असतानाच ही दुःखद घटना घडल्याने वारकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मृत वारकऱ्यांच्या आठवणीने दिंडीतील वातावरण अत्यंत भावुक झाले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here