पाटण : वारीला गेलेल्या दांपत्याच्या घरी घरफोडी करत चौघांनी घरातील साडेआठ तोळे सोन्याचे दागिने व २० हजारांच्या रोकड लंपास केली. गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटे दिसून आल्याने पोलिसांनी त्याद्वारे तपास सुरू केला आहे.
याबाबत पोलिसांची माहिती, विहे येथील लक्ष्मी मंदिराच्या पाठीमागे वास्तव्यास असणाऱ्या आनंदराव गणपत मोरे यांच्या घरात शनिवारी रात्री दीडच्या सुमारास चोरी झाली. यात चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केल्यानंतर समोर असणाऱ्या दाराची कडी कटावणीने तोडून घरात प्रवेश केला. घरात कोणीच नसल्यामुळे चोरट्यांनी घरातील कपाट कटावणीने उघडून त्यातील ड्रॉव्हरमध्ये साडेआठ तोळे सोन्याचे दागिने व २० हजारांची रक्कम चोरून नेली. यात कपाटातील वस्तू व इतर घरातील वस्तू याची शोधाशोध करून ते अस्ताव्यस्त फेकले.
शनिवारी रात्री अनेक ठिकाणी चोरीचा प्रयत्न करत असल्याचे सीसीटीव्हीत निदर्शनास आले. यामध्ये आणखीन दोन ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. यात घरावर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये चार चोरटे टेहाळणी करताना निदर्शनास आले आहेत. त्यांच्या हातात कुऱ्हाड, कटावणी दिसून येत आहे. त्यांनी अनेक ठिकाणी घरांची पाहणी केली आहे. त्यानंतर लक्ष्मी मंदिरामागे असणाऱ्या बंगल्यात या चार चोरट्यांनी घुसून कपाटातील दागिने व रोकड चोरून नेल्याची बाब रविवारी सकाळी शेजाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर पोलिस पाटील यांना कळविले.
सकाळी दहा वाजता पोलिसांनी घटनास्थळी तपासणी करत श्वान पथकाच्या माध्यमातून तपास सुरू केला. मल्हारपेठचे सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मछले यांनी या चोरीबाबत तपासासाठी दोन पथके तैनात करणार असल्याचे सांगितले. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.