सातारा प्रतिनिधी : दिनांक ०७/०७/२०२५ रोजी दुपारी १२:०० ते ३:३० वाजेच्या दरम्यान, शिवथर (ता. जि. सातारा) येथील पूजा प्रथमेश जाधव (वय २७, विवाहित) हिचा तिच्या राहत्या घरी अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून क्रूरपणे खून केला. या घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४५/२०२५, बी.एन.एस. कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल झाला.

पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पोलिस निरीक्षक नीलेश तांबे यांना तपास त्वरित पूर्ण करून आरोपीला अटक करण्याचे निर्देश दिले. तपास पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे धक्कादायक खुलासा केला की, पूजाचा खून तिच्या प्रियकरानेच केला आहे.
तपासात समोर आले की, पूजा गेल्या सहा वर्षांपासून शिवथरमधील एका २८ वर्षीय व्यक्तीशी अनैतिक प्रेमसंबंधात होती. आरोपीने तिला पळून जाऊन लग्न करण्याचा सातत्याने तगादा लावला होता, परंतु पूजाने नकार दिल्याने संतप्त झालेल्या आरोपीने तिचा गळा दाबला आणि धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून तिचा खून केला. खून करून तो घटनास्थळावरून फरार झाला.
पोलिस निरीक्षक नीलेश तांबे यांनी तात्काळ तपास पथके गठित करून आरोपीचा शोध सुरू केला. सहायक पोलिस निरीक्षक विनोद नेवसे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी पुणे येथील स्वारगेट परिसरात लपून बसल्याचे शोधले. अवघ्या ८ तासांत पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.
या कारवाईत अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले यांनी पोलिस ठाण्यात थांबून पथकाला मार्गदर्शन केले. पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नीलेश तांबे यांच्या सूचनांनुसार सहायक पोलिस निरीक्षक विनोद नेवसे, अनिल मोरडे, पोलिस उपनिरीक्षक अभिजीत गुरव, सोनू शिंदे, पोलिस हवालदार दादा स्वामी, पंकज ढाणे, राजू शिखरे, मालोजी चव्हाण, मनोज गायकवाड, रामचंद्र गोरे, संदीप आवळे, राहुल राउत, सचिन पिसाळ, पोलिस नाईक सतीश बाबर, प्रदीप बाबर, पोलिस शिपाई सुनिल भोसले, पोलिस कॉन्स्टेबल संदीप पांडव, संदीप फणसे यांनी ही कामगिरी यशस्वी केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विनोद नेवसे करीत आहेत.