१७.९० लाखांचा मुद्देमाल जप्त
सातारा प्रतिनिधी : महाबळेश्वर येथील हॉटेल ऑक्सिजनमधून ९,९०,८५०/- रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य, फर्निचर आणि भांडी चोरणाऱ्या तीन चोरट्यांना सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि महाबळेश्वर पोलिसांनी मुंबई विमानतळावरून अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी आहेत: १) कांचन कालीप्रसाद बनर्जी (वय ५४, रा. रूम नं. १७, नागरिक कॉलनी, विरमाता जिजाई नगर, मोरेगाव, नालासोपारा, वसई ईस्ट), २) करण दशरथ घाडगे (वय २५, रा. आंबवडे खुर्द, ता. जि. सातारा), ३) गौतम सुरेश जाधव (वय २५, रा. यशवंतनगर, सैदापूर, ता. जि. सातारा).
२५ ते २८ जून २०२५ दरम्यान झालेल्या या चोरीच्या गुन्ह्याचा (गु. र. नं. ५८/२०२५, भा. द. वि. ३०५, ३३१(३), ३३१(४)) तपास करत पोलिसांनी मुख्य आरोपी कांचन बनर्जीला दुबईला पळून जाण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीचा माल आणि ट्रक-टेम्पोसह १७,९०,८५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तपासात आरोपींनी चोरीचा माल साताऱ्यातील भंगार व्यावसायिकांना विकल्याचे कबूल केले.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, बापुसाहेब सांडभोर, उपनिरीक्षक परितोष दातीर आणि महिला उपनिरीक्षक रुपाली काळे यांच्या पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे ही कामगिरी केली. या यशस्वी कारवाईबद्दल सातारा पोलिसांचे कौतुक करण्यात आले आहे.