पोहेगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील सहकार चळवळीतील अग्रगण्य संस्था म्हणून ओळख असलेल्या चांदेकसारे विकास सोसायटीची बँक पातळीवर ३०/६ अखेर शंभर टक्के वसुली झाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुभाष होन यांनी दिली.
संस्थेचे अध्यक्ष सुभाष होन, उपाध्यक्ष राजाभाऊ होन, सचिव विजय खरात व संचालक मंडळ यांनी वसुलीसाठी गेल्या दोन महिन्यापासून कामकाज पाहिले. बँक पातळीवर वसूल करण्यासाठी बँकेचे शाखा अधिकारी भानुदास बैरागी, बँक इन्स्पेक्टर श्री गाडे, तालुका विकास अधिकारी श्री लोहकरे,श्री लासनकर, श्री पानगव्हाणे, श्री जगदाळे, महेर यांनी वसुली काळात मोठी मदत केली. 30 जून 2025 अखेर बँक पातळीवर पीक कर्ज 1 कोटी 42 लाख व मध्यम मुदत 2 लाख 40 हजार बँक पातळीवर वसूल झाले असे संस्थेचे सचिव विजय खरात यांनी सांगितले.
संस्था ही सभासदांची जननी असून सभासदांनी संस्थेकडून घेतलेले कर्ज वेळेवर भरले तर सभासदांना शून्य टक्के तसेच 3% व्याज परताव्याचा लाभ मिळतो. त्यासाठी सभासदांनी थकबाकीत न राहता 31 मार्च अखेर कर्ज रक्कम भरून शून्य टक्के तसेच तीन टक्के व्याज परतावा मिळण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सुभाष होन, उपाध्यक्ष राजाभाऊ होन, संचालक मंडळाने केले आहे. वसुली दिलेल्या सर्व सभासदांचे सचिव विजय खरात यांनी आभार मानले.