कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह सात राज्यांतील गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या शाहूपुरी येथील ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपमेंट कंपनीचा बहुचर्चित ‘गोल्डनमॅन’ आणि मुख्य एजंट संदीप लक्ष्मण वाईंगडे (वय 39, रा. पाटील गल्ली, उचगाव, ता. करवीर) यास स्थानिक गुन्हे अन्वेषणने गुरुवारी जेरबंद केले. त्याच्याकडून आलिशान मोटार हस्तगत करण्यात आली आहे.
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ए. एस. ट्रेडर्स कंपनीशी संबंधित असलेल्या आणखी 12 संशयित एजंटांची नावे निष्पन्न झाली आहेत. संबंधितांवर लवकरच अटकेची कारवाई करण्यात येणार आहे, असे तपासाधिकारी रवींद्र कळमकर यांनी सांगितले. गुन्ह्यातील 26 संशयितांपैकी 19 जणांना आजअखेर अटक करण्यात आली आहे. नव्याने 12 जणांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने 38 जणांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपमेंट कंपनीमध्ये संशयित संदीप वाईंगडे प्रमुख एजंट म्हणून कार्यरत होता. अंगावर ढीगभर सोन्याचा पेहराव करून त्याने स्वत:चा वेगळाच दबदबा निर्माण केला होता. कंपनीच्या शाहूपुरी येथील कार्यालयाशेजारी त्याने स्वत:चे आलिशान कार्यालय थाटले होते. आलिशान मोटारीसह दिमतीला स्वत:च्या कर्मचार्यांची फौज, असा त्याचा तोरा होता. कंपनीशी संलग्न त्याची कोट्यवधीची उलाढाल होती.
मुख्य संशयित लोहितसिंग सुभेदारसह संचालक, एजंटांविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच गोल्डनमॅन संदीप वाईंगडे याने शाहूपुरी येथील स्वत:चे कार्यालय गुंडाळून पोबारा केला होता. फसवणुकीच्या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न होताच पथकाने त्याला उचगाव (ता. करवीर) येथून जेरबंद केले. न्यायालयाने त्यास 11 जुलैपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
संशयिताकडून 10 लाख रुपये किमतीची मोटार हस्तगत करण्यात आली आहे. मुख्य संशयित लोहितसिंग सुभेदारकडून मिळालेले 13 तोळे दागिने गहाण ठेवून त्यावर कर्ज काढल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित दागिनेही लवकरच जप्त करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. गुन्ह्यात अटक झालेल्या 19 संशयितांविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याचेही तपासाधिकार्यांनी सांगितले.
कंपनीचा मुख्य सूत्रधार लोहितसिंग सुभेदार याच्यासह संचालक व एजंटांच्या स्थावर मालमत्ता जप्त करून लिलाव करण्यासंदर्भात शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला प्रधान सचिव (विशेष) यांनी मंजुरी दिली आहे. जप्त मालमत्तांवरील नियंत्रणासाठी करवीर प्रांताधिकारी यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचेही कळमकर यांनी सांगितले.