किमान वेतन आणि पीएफसह विविध मागण्यांसाठी एल्गार..
महाबळेश्वर प्रतिनिधी : महाबळेश्वर नगरपालिकेतील कंत्राटी कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असंघटित कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले असून, युवा नेते श्री. स्वप्निल भाई गायकवाड आणि शहर अध्यक्ष श्री. विनय गायकवाड यांच्या उपस्थितीत कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी एल्गार पुकारला आहे.
कामगारांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत: किमान वेतनाप्रमाणे पगार: कामगारांना किमान वेतनानुसार पगार मिळावा, ही त्यांची मुख्य मागणी आहे. दरमहा पीएफ खात्यावर जमा: भविष्य निर्वाह निधी (पीएफ) दर महिन्याला कामगारांच्या खात्यात नियमितपणे जमा करण्यात यावा. कामगार कायद्यानुसार ४ पगारी सुट्ट्या: कामगार कायद्यानुसार दर महिन्याला चार पगारी सुट्ट्या मिळाव्यात, अशी मागणी कामगारांनी केली आहे. खाजरी रजिस्टरचा वापर: कामगार कायद्यानुसार खाजरी (हजेरी) रजिस्टरचा वापर करण्यात यावा, जेणेकरून कामाचे आणि वेतनाचे योग्य रेकॉर्ड ठेवले जाईल.
मागील ठेकेदाराकडील थकीत पगार व पीएफ: मागील ठेकेदाराकडे असलेला थकीत पगार आणि पीएफची रक्कम तात्काळ कामगारांच्या खात्यात जमा करण्यात यावी या मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनामुळे नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून यावर काय भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.