सातारा : धर्मामध्ये तुलना केली तर बौद्ध धम्मात भिक्खु संघाचे मोठे काम आहे.त्यांना कोणत्याही प्रकारची अभिलाषा नसते.बुद्ध विचारांची आचारसंहिता तंतोतंत पाळतात. असे प्रतिपादन विवेक मस्के व चंद्रकांत मस्के यांनी केले.
येथील डॉ.आदिनाथ माळगे यांच्या निवासस्थानी वर्षावास कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तेव्हा मस्के द्वयी मार्गदर्शन करीत होते.विवेक मस्के म्हणाले,”भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म हा डॉ.बाबासाहेबांनी लिहिलेल्या ग्रंथामुळे खऱ्या अर्थाने धम्म समजण्यास साह्य झाले आहे.” चंद्रकांत मस्के म्हणाले, “धम्माचा सार संविधानात असल्याने मानव कल्याण होत आहे.भिक्खुंचे कर्म महान आहे.त्यांनी शांतीचा मार्ग दाखवला आहे.सम्यक दृष्टी,वाणी व संकल्पना असणे गरजेचे आहे.”
मंगेश डावरे म्हणाले,”धम्म चळवळ गतिमान करण्यासाठी अधिकाधिक श्रामणेर निर्माण झाले पाहिजेत.सर्वांनी अष्टांगिक मार्ग चोखाळला पाहिजे.”सम्यक ज्येष्ठ नागरिक संघाचे बी.एल.माने म्हणाले, “बाबासाहेबांनी लिहिलेल्या ग्रंथात सर्वकाही आहे.भिक्खु घडलेला असतो.त्यांना धन मिळत नाही.तर ते भिक्खु संघास अधीन राहून कार्यरत असतात. श्रामनेरबरोबर विपश्यना करणे गरजेचे आहे.”
प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तदनंतर भीमबुद्ध गीतांची मैफिल रंगली होती. ग्रंथाचे वाचन विवेक मस्के यांनी केले तर त्यावर अनेकांनी स्पष्टीकरण दिले. सदरच्या कार्यक्रमास डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे कोषाध्यक्ष ऍड.हौसेराव धुमाळ,कार्याध्यक्ष अनिल वीर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, सरचिटणीस गणेश कारंडे, पतसंसंस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, ऍड. विलास वहागावकर, बाळासाहेब सावंत,अंकुश धाइंजे,वसंत गंगावणे,ढोलदीपटू दिलीप कांबळे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व उपासक उपस्थीत होते.