सत्यशोधक कामगार संघटनेचा चांदुर बिस्वा येथे कामगार मेळावा संपन्न!

0

विशेष प्रतिनिधी नांदुरा:- सत्यशोधक कामगार संघटनेचा भव्य मेळावा दिनांक १०/७/२०२५ रोजी चांदुर बिस्वा येथे संपन्न झाला. यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सुभाष काशीराम तायडे हे होते,तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सत्यशोधक कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर तायडे, मुख्य अतिथी भाई बाबुराव सरदार राज्य प्रवक्ते भूमी मुक्ती मोर्चा महाराष्ट्र, नितीन वाकोडे राज्य संघटक बिल्डिंग पेंटर बांधकाम व इतर असंघटित मजूर संघ हे होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतीबा ज्योतीबा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले,यावेळी मान्यवरांनी मेळाव्याला संबोधित केले.

सत्यशोधक कामगार चळवळ जी महात्मा ज्योतीराव फुल्यांची चळवळ म्हणून ओळखली जाते.भारतीय कामगार चळवळीचे प्रणेते जनक रावबाहदूर नारायण मेघाजी लोखंडे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची स्वतंत्र मजदूर युनियन आहे. हा कामगार मेळावा कामगारांच्या उत्थानासाठी असुन सर्व कामगारांनी जात,धर्म,पंथ, राज्य सोडून आपल्या न्याय्य हक्कांसाठी एकत्र येवून भांडवलशाहीच्या विरोधात लढा तिव्र करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन कामगार नेते तथा प्रसिद्ध साहित्यिक, पत्रकार,स्तंभ लेखक,असंघटित कामगार चळवळीचे प्रणेते राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सागरजी तायडे मुंबई,यांनी केले ते या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संबोधतीत करत होते.

असंघटित कष्टकरी कामगारांच्या न्याय, हक्क व प्रतिष्ठेसाठी लढणारी सत्यशोधक कामगार संघटना ही १९८२ साली स्थापन करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिष्य रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे या सत्यशोधकाच्या नेतृत्वाखाली मिलमध्ये काम करणाऱ्या असंघटित कष्टकरी कामगारांची देशातील पहिली कामगार संघटना बांधून पहिला देशव्यापी संप घडवून आणला.अशा क्रांतिकारी विचारांच्या कामगार चळवळीच्या नेत्याची महान परंपरा सत्यशोधक कामगार संघटनेला लाभली आहे.

या प्रसंगी सत्यशोधक चळवळीत महाराष्ट्र राज्याचे महासचिव म्हणुन भाई बाबुराव सरदार यांची नियुक्ती करण्यात आली.राज्यस्तरावर कामगारांसाठी न्याय मागण्या साठी शेतमजूर आणि वेठीबिगारी कामगार यांना न्याय व हक्क देण्यासाठी असलेली रजिस्टर संघटनेचा राज्यस्तरीय महासचिव म्हणुन नियुक्ती देतांना राष्ट्रीय अध्यक्ष आयु. सागर तायडे यांनी संविधान आणि त्यातील कामगारांसाठी असलेले कायदे भाई सरदार यांना पुरेपूर ज्ञात असल्याने एक अभ्यासु आणि लढाऊ धाडसी नेता चळवळीला मिळाल्याने राज्यात प्रशासकिय अधिकाऱ्यांशी सनदशिर मार्गाने चर्चा करून कामगार मजुरांना न्याय मिळवून देण्यास सोपे जाईल.अशा प्रकारची भावना सागर तायडे यांनी आपल्या मार्गदर्शनीय भाषणात व्यक्त केली.भाई बाबुराव सरदार यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी भाई सरदार यांचे अत्यंत अभ्यासपूर्ण संविधानिक कामगार चळवळीवर भाषण झाले. चांदुर बिस्वा येथील माजी सरपंच तथा युवा नेते सुभाष तायडे याप्रसंगी त्यांच्याकडे बुलढाणा जिल्हाध्यक्ष पद,तथा दिनेश ब्राम्हणे (पत्रकार) यांना नांदुरा तालुकाध्यक्ष पद देण्यात आले.यावेळी अनेक कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या सागर तायडे साहेबांनी केल्या.मंचावर,नितीन वाकोडे,बिल्डिंग पेंटर बांधकाम व इतर असंघटित मजूर संघाचे राज्य संघटक होते.यावेळी नितीन वाकोडे याचेही समायोचित भाषण झाले.दिनेश ब्राम्हणे यांनी उत्कृष्ट सूत्र संचलन केले. तर आभार प्रदर्शन,सेवानिवृत आर पी एफ अधिकारी मा.काशीराम तायडे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेन्द्र वानखेडे,जयकांत पवार,मुकींदा वाकोडे, विजयानंद तायडे,शेख मतीन,रमण पडोळकर,गजानन पडोळकर,सुरेश वाढे,सुरेश गोळे,रवि इंगळे आदिनी मोलाचे सहकार्य केले.असंघटित शेतकरी,शेतमजूर,बिगारी मजूर,बिल्डिंग कामगार मजुर,या मेळाव्या बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here