कोल्हापूरात राष्ट्रीय महामार्गाचा झाला फुटपाथ? महामार्गावरील खड्ड्यात चक्क पेव्हिंग ब्लॉक

0

कोल्हापूर : महामार्गावरील खड्ड्यांमध्ये चक्क पेव्हिंग ब्लॉक वापरुन रस्ता दुरुस्ती करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हा प्रकार पाहायला मिळाला आहे. महामार्ग प्राधिकरणाने लक्ष घालून यात सुधारणा करण्याची मागणी होत आहे.
कोल्हापूर – पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कागल ते सरनोबतवाडी दरम्यान रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी चक्क पेव्हिंग ब्लॉकचा वापर करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अजब कारभारामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या जनसामान्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी रस्त्यांच्या दर्जाबाबत आग्रही आहेत मात्र दुसरीकडे ठेकेदार त्यांच्या धोरणांनाच हरताळ फासत असल्याचे चित्र कोल्हापुरात पाहायला मिळत आहे.

खड्ड्यांची डागडुजी पेव्हिंग ब्लॉक वापरून – राज्यातील सर्वात व्यग्र महामार्ग म्हणून मुंबई-पुणे-बेंगलोर हा महामार्ग ओळखला जातो. सध्या सातारा-कागल या महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. या महामार्गावर कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. कागल जवळील लक्ष्मी टेकडी जवळ सुमारे तीन फूट पडलेल्या खड्यात ठेकेदाराने पेव्हिंग ब्लॉक वापरून हा खड्डा भरला आहे, असाच प्रकार कागलपासून उंचगावपर्यंत पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाहायला मिळतो. कागल ते सातारा या महामार्गाच्या दुरुस्तीचा ठेका एका खासगी कंपनीकडे आहे. मात्र या कंपनीकडून महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे. दररोज या महामार्गावरून हजारो अवजड वाहने प्रवास करतात. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघात घडत आहेत. मात्र यावर तुटपुंजा इलाज म्हणून खड्ड्यांमध्ये पेव्हिंग ब्लॉक टाकून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

असुविधेच्या गर्तेत महामार्ग – पुणे-बेंगलोर महामार्गाशेजारी शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल पंचतारांकीत औद्योगिक वसाहत वसलेली आहे. यामुळे या महामार्गावरून अवजड वाहने मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. महामार्गावरच तीन-तीन फुटांचे खड्डे पडल्याने चार चाकी आणि दुचाकी वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. गेल्या अनेक वर्षांपासून या समस्या कायम आहेत. मात्र मुर्दाड ठेकेदारांपुढे आता महामार्ग प्राधिकरणही हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कर्नाटकातील महामार्गाशी तुलना करता राज्यात प्रवेश केल्यानंतर महामार्गाचा दर्जा आणि सुविधेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here