संगमनेर : १६ एप्रिल रोजी राज्य सरकारच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघाताने अनेक भाविकांचा बळी गेला तर अनेक नागरिक आजारी पडले आहेत. एप्रिलच्या मध्यात सूर्य आग ओकत असताना राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष करीत ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या लाखो अनुयायांना कार्यक्रमासाठी बोलावले. हे करत असताना त्यांच्यासाठी सावली, अन्न व पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने लाखोने जमलेल्या समुदायातील अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला आणि त्यात त्यांचा जीव गेला. या घटनेला राज्यातील शिंदे – फडणवीस यांचे सरकार जबाबदार असून त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.
संगमनेरात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार बाळासाहेब थोरात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, १६ एप्रिल रोजी राज्य सरकारने ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला. सकाळी दहा वाजता असणाऱ्या या कार्यक्रमासाठी खारघर मध्ये राज्यभरातून लाखो भाविक उपस्थित होते. या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती अपेक्षित असतानाही राज्य शासनाकडून कार्यक्रम स्थळी सावलीची व इतर व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे दुपारच्या उन्हाचा तीव्र चटका बसल्याने अनेक जण अस्वस्थ झाले व त्यातील १३ जणांचा जीव गेल्याचे सरकारने जाहीर केले. मात्र सरकार मृताचा आकडा लपवीत असून या दुर्घटनेत कितीतरी अधिक निष्पाप भाविकांचा बळी गेल्याचा आरोपही माजी मंत्री थोरात यांनी यावेळी केला. ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना मानणारा मोठा वर्ग राज्यात आहे.त्यामुळे सदर पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी त्यांना मानणारा मोठा वर्ग उपस्थित राहील हे सरकारला माहिती असताना सुद्धा त्यांच्या सुविधेसाठी राज्य सरकारने १३ कोटी रुपये खर्च करण्याची ही तयारी केली होती. मात्र इतक्या मोठ्या रकमेतून सरकारने केवळ महत्त्वाच्या व्यक्तींसाठी वातानुकूलित तंबू आणि शाही खान पाण्याची व्यवस्था केली. मात्र जमलेल्या लाखो नागरिकांना वाऱ्यावर सोडून देण्यात आले.त्यातच सकाळचा दहाचा कार्यक्रम दुपारी साडेअकरा वाजता सुरू झाला आणि दीड वाजता संपला.यावेळी सूर्य अक्षरशः आग ओकत होता. सुमारे ४३ अंशाच्या पुढे टेंपरेजर होते. मात्र सरकारने त्याचा विचार केला नाही. एवढ्या मोठ्या उन्हात एवढ्या मोठ्या संख्येने माणस बोलवायची होती तर त्यांच्यासाठी सावलीची व अन्न पाण्याची व्यवस्था का केली नाही ? असा सवाल आमदार बाळासाहेब थोरात यांनी यावेळी उपस्थित केला. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या काही जणांच्या शवविच्छेदन अहवालातून त्यांच्या पोटात अनेक तासात अन्न व पाण्याचा एक कणही गेला नसल्याचे समोर आल्याचा दावाही आमदार थोरात यांनी करत सरकार म्हणून नियोजन करताना शिंदे- फडणवीस सरकारचा बेफिकीरपणा व निष्काळजी पणा नव्हे तर सरकारची कृरताही स्पष्टपणे दिसून आल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. या घटनेला राज्य सरकार जबाबदार असून या गुन्ह्याचा पश्चाताप म्हणून नैतिकतेच्या आधारावर शिंदे -फडणवीस सरकारने राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली.
चौकट : विशेष अधिवेशन बोलवा :- आ. थोरात
प्रदेश काँग्रेसची भूमिका मांडताना या घटनेची जबाबदारी निश्चित करण्यासाठी सरकारने तातडीने दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत सरकारनेच आयोजित केलेल्या अशा प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमात इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांचे जीव जाण्याचा प्रसंग यापूर्वी कधीही घडलेला नसून सरकार त्यावरील चर्चेपासून पाठ फिरवू शकत नाही. त्यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलावून त्यावर चर्चा करणे आवश्यक असल्याचे आ. थोरात यांनी यावेळी सांगितले.