जामखेड तालुका प्रतिनिधी :
महसूलमंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा जिल्हा विभाजनास पाठिंबा आहे. त्यांनी पुढाकार घेतला तर विभाजनाचा प्रश्न सुटू शकतो परंतु त्यासाठी योग्य वेळ, योग्य ठिकाण पाहिजे. जसे जिल्ह्य़ाचे नामकरण करण्यासाठी ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंती निमित्त चोंडी येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असा योग जुळवून आला होता त्याप्रमाणे योग्य वेळ, योग्य ठिकाण असेल तर जिल्हा विभाजन होऊ शकतो व त्यादृष्टीने अंमलबजावणी चालू आहे अशी माहिती जामखेडला पत्रकार परिषदेत आ. राम शिंदे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला देशात नऊ वर्षे पूर्ण झाली याबद्दल भाजपच्या वतीने रविवारी सकाळी आठ वाजता आ. राम शिंदे यांच्या उपस्थितीत ५०० मोटार सायकलची रॅली काढण्यात आली यानंतर नागेश्वर मंदिर परिसरात टिफीन बैठक भाजप पदाधिकारी यांची घेतली. आ. राम शिंदे सह कार्यकर्त्यांनी जेवणाचे डबे आणून जेवण केले. आ. प्रा.राम शिंदे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यानंतर अयोजीत पत्रकार परिषदेत आ. राम शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांत राबवलेल्या विविध योजना यांची सविस्तर माहिती दिली. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना आ. राम शिंदे म्हणाले, अहमदनगर जिल्हा मोठा आहे. जिल्ह्य़ाचे विभाजन व्हावे यासाठी मी पालकमंत्री असताना प्रयत्न केले. विभाजनास उत्तर व दक्षिण मधील जनतेची इच्छा होती. व त्यावेळी झालेल्या आंदोलनाला मी पाठिंबा दिला होता. तत्कालीन विरोधी पक्षनेते व आत्ताचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा विभाजनास पाठिंबा होता. विभाजनाचा अंतिम प्रस्ताव तयार झाला असताना सरकार गेले. आता पुन्हा ही मागणी जोर धरू लागली आहे. आता महसूल व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत ते पुढाकार घेतील व त्यादृष्टीने अंमलबजावणी चालू असल्याचे आ. राम शिंदे यांनी सांगितले.
कर्जत बाजार समिती निवडणूकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे आमच्या बरोबर होते त्यामुळे मोठय़ा बहुमताने आमच्या पक्षाचा विजय झाला असे आ. राम शिंदे म्हणाले तसेच जामखेड शहराला उजनी धरणातून पाणीपुरवठा करणारी योजना २५० कोटीची असून त्या योजनेला अंतिम मंजुरी मिळाली आहे लवकरच टेंडर प्रक्रिया होईल व त्याचे भुमीपुजन केले जाणार आहे. माझ्या आमदारकीला आता वर्ष पूर्ण होत असून या वर्षभराच्या काळात कर्जत जामखेड मतदारसंघात रस्ते व विविध विकास कामांसाठी २०० कोटीचा निधी आपण आणला आहे. मागील आठवडय़ात बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना १५०० कोटीची मदत जाहीर करण्यात आली आहे. या रकमेतून जामखेड व कर्जत मतदार संघातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असे आ. राम शिंदे म्हणाले.
या पत्रकार परिषदेस भाजपाचे ता.अध्यक्ष अजय काशिद, नगरसेवक अमित चिंतामणी, शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, जिल्हा उपाध्यक्ष आजीनाथ हजारे, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, सलीम बागवान ;उध्दव हुलगुंडे, डॉ. अल्ताफ शेख, ऋषिकेश मोरे, सोमनाथ पाचारणे, अभिजीत राळेभात, उदय पवार, जांलीदर खोटे, अॅड प्रविण सानप, जांलीदर चव्हाण, अर्जून म्हेत्रे, तुषार बोथरा आदी भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पस्थित होते.