मुलाचा खूनप्रकरणी, आईसह प्रियकरास जन्मठेप

0

वाई : अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने लहान मुलाला कालव्यामध्ये ढकलून त्याच्या खुनास कारणीभूत ठरल्या प्रकरणी आई आणि तिचा प्रियकर यांना जन्मठेपेची शिक्षा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय सुनावली आहे. वाई येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय झाल्यानंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली हा पहिलाच खटला आहे.

अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने लहान मुलाला कालव्यामध्ये ढकलून त्याच्या खुनास कारणीभूत ठरल्या प्रकरणी मुलाची आई आणि तिचा प्रियकर यांना वाईचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर एम मेहरे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अश्विनी प्रकाश चव्हाण (वय ३५, वृंदावन कॉलनी, नावेचीवाडी, वाई) हिने २८ एप्रिल २०१९ रोजी गौरव प्रकाश चव्हाण हा चार वर्षांचा मुलगा हरवल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दिली होती.

तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे व सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र निंबाळकर संबंधित महिलेकडे चौकशी करत होते. यावेळी तिच्या बोलण्यामध्ये विसंगती आढळून येत होती. ती प्रत्येक वेळी वेगवेगळी माहिती तपासी अधिकाऱ्यांना देत होती. यामुळे पोलिसांना संशय आला.

तिच्याकडे अधिक चौकशी करत असताना तिने अनैतिक संबंधांमध्ये अडथळा येत असल्याने तिचा प्रियकर सचिन शिवराम कुंभार (वय ४८, बावधन ता. वाई) याच्या मदतीने आपल्या लहान मुलाला धोम धरणाच्या डाव्या कालव्यात फेकून दिल्याचे सांगितले. पोलिसांनी कालव्यात शोध मोहीम राबवल्यानंतर मुलाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी महिलेसह प्रियकर सचिन कुंभार याला अटक केली होती. सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र निंबाळकर यांनी तपास करून दोषारोप पत्र दाखल केले होते. वाई येथील अतिरिक्त सत्र व फौजदारी न्यायालयात न्या. आर. एम. मेहरे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू होती.

अनैतिक संबंधांमध्ये अडथळा येत असल्याने मुलाला कालव्यात फेकून त्याचा खून केल्याचा सरकारी वकील एम. यू. शिंदे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून मुलाची आई अश्विनी चव्हाण व तिचा प्रियकर सचिन कुंभार यांना भा.द.वि.सं कलम ३६३ प्रमाणे ५ वर्षे शिक्षा दंड व भा.द.वि.सं कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा व दाेन्ही मिळून ३० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद अशी शिक्षा ठाेठावण्यात आली आहे.

सदरचे केसकामी सहा. सरकारी अभियोक्ता ॲड. ए. आर. कुलकर्णी, ॲड. डी. एस. पाटील, ॲड. दिनेश धुमाळ, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र भालचिम, परि. पोलीस उपअधिक्षक शाम पानेगावकर यांनी परिश्रम घेतले. पोलीस महिला कर्मचारी हेमा कदम यांनी न्यायालयीन कामात साह्य केले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here