देवळाली प्रवरा / प्रतिनिधी,
वर्कशॉप मधील सामान चोरुन नेत असताना नागरीकांनी दोन भामट्यांना रंगेहाथ पकडून यथेच्छ धुलाई करत पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे दि. ३ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली.
मुकतार बादशाहा शेख, वय ५५ वर्षे, यांचे राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे नगर मनमाड रोड फातिमा चर्ज समोर श्रमिक नावाचे इंजिनिअर वर्क शॉपचे दुकान आहे. दि. २ मार्च २०२५ रोजी रात्री ९.३० वाजे दरम्यान मुकतार शेख हे वर्क शॉप बंद करुन घरी गेले होते.

दि. ३ मार्च २०२५ रोजी पहाटे १ ते १.३० वाजे दरम्यान दोन भामट्यांनी मुकतार शेख यांचे वर्क शॉप दुकानचे कुलूप तोडुन आत प्रवेश केला. आणि दुकानातील सामान चोरुन नेत होते. त्यावेळी शेजारीच राहणारा अजय भाऊसाहेब सांळुके यांनी सदर घटना पाहून मुकतार शेख यांना फोन करुन कळवीले. त्यावेळी मुकतार शेख हे ताबडतोब त्यांच्या वर्क शॉपमध्ये गेले. त्यावेळी दोन भामटे वर्क शॉपमधील सामान चोरुन पळून जाऊ लागले.
तेव्हा परिसरातील काही नागरिकांनी सदर दोन भमट्यांचा पाठलाग करुन त्यांना पकडले. त्यांची यथेच्छ धुलाई करुन नंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. मुकतार बादशाहा शेख यांच्या फिर्यादीवरून आरोपी राहुल रमेश धोत्रे, वय २३ वर्षे, कार्तिक भारत चावरे, वय २० वर्षे, दोघे रा. नगरपरिषद शेजारी देवळाली प्रवरा, ता. राहुरी, या दोघांवर गुन्हा रजि. नं. १९७/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१ (६) प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
