ज्या बलिदानाला जगाच्या इतिहासात तोड नाही अशा छत्रपती संभाजीराजांनी निद्रेचे चार तास सोडले तर सतत वीस तास अखंड जीवन स्वराज्य रक्षणासाठी घालविले. छत्रपती संभाजी राजांचे चरित्र त्यांचे जीवन हे सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ आणि सूर्यासारखे प्रखर तेजस्वी होते अशा स्फटिकाप्रमाणे निर्मळ असलेल्या राजांचे चरित्र सर्वांनीच विचारात घेऊनच आचरायला हवे .छत्रपती संभाजीराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील सासवडजवळ पुरंदर किल्ल्यावर १४ मे १६५७ रोजी महाराणी सईबाई यांच्या पोटी झाला.
सईबाईंचे ५ सप्टेंबर १६५९रोजी निधन झाले. आणि संभाजीराजांचे मातृत्वाचे छत्र हरपले तेव्हा कापूरहोळ येथील धाराबाई गाडे यांना युवराज संभाजीराजांच्या दूध आई म्हणून गडावर आणले.राजमाता जिजाऊनी व सर्व सावत्र मातांनी संभाजी राजांना अगदीजीवापाड जपले जिजाऊंनी संभाजीराजांना संस्कृत ,मराठी, हिंदी व इतर भाषा आणि युद्धकलेचे शिक्षण दिले त्यामुळेच संभाजीराजे बालपणी संस्कृत पंडित व उत्तम योद्धा म्हणून नावलौकिकास पावले. वयाच्या आठव्या वर्षी स्वराज्यरक्षणासाठी संभाजीराजे राजकारणात आले दिलेरखान व जयसिंगाशी छत्रपती शिवरायांनी केलेल्या पुरंदरच्या तहाच्या पूर्ततेसाठी व उर्वरित स्वराज्य रक्षणासाठी आठ-साडे आठ वर्षाच्या संभाजी राजांना मोगलांकडे ओलीस रहावे लागले.
राजमाता जिजाऊंच्या संस्कृत शिक्षणाचा परिणाम संभाजीराजांवर झाल्याने राजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धभूषण नावाच्या संस्कृत ग्रंथांची निर्मिती केली तसेच नखशिख,नायिकाभेद व सात सतक हे तीन ग्रंथ लिहिले. म्हणजेच बालवयातच ग्रंथ लेखन करणारे छत्रपती संभाजी महाराज हे प्रतिभावंत लेखक होते .
छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली. संभाजी महाराजांनी गनिमीकाव्याचा चपखलपणे वापर करत शत्रूंना अक्षरशः झुंजवले, लोळवले आणि परास्त केले. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे १२० युद्धे केल्याची नोंद आढळते. मात्र, एकाही लढाईत ते कधीही पराभूत झाले नाहीत. संगमेश्वर येथे कैदकेलेल्या छत्रपती संभाजी महाराजांना १५ फेब्रुवारी १६८९ रोजी औरंगजेबाच्या बहादूर गड येथील छावणीत आणण्यात आले संभाजीराजांवर ह्या ठिकाणी धर्मांतरासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला. छत्रपती संभाजी राजांनी सर्व किल्ले मुघलांच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवदान देण्याची अट औरंगजेबाने घातली होती. मात्र, संभाजी राजेंनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजी राजेंवर अनन्वित अत्याचार केले. असह्य यातना सहन करूनही छत्रपती संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. क्रूर औरंगजेबाने संभाजी राजेंवर अनन्वित अत्याचार केले.अत्याचाराने परिसीमा गाठली, तरी संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेर ही उमटली नाही. धर्माभिमानी, लढवय्या, असामान्यशौर्य, पराक्रम, कर्तृत्वगाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही.अखेर फाल्गुन अमावास्या म्हणजेच,11 मार्च १६८९ रोजी छत्रपती संभाजीराजे व कवी कलश यांना मृत्युदंड देण्यात आला.
सात लाख मोगली सेनाविरुद्ध मुठभर मराठे 63 वर्षाचा कुटील औरंगजेबाविरूद्ध 24 वर्षाचे छत्रपती संभाजीराजे सर्वात शक्तिशाली मोगली सामर्थ्य आणि तीन चार जिल्ह्यांनी इतकेस्वराज्य असा विषम लढा छत्रपती संभाजी महाराजांनी महाराष्ट्रात नऊ वर्ष सुरू ठेवला. रामशेज किल्ल्याच्या पराभवाने चिडलेल्या औरंगजेबाने जोपर्यंत संभाजी राजांना पकडणार नाही तोपर्यंत डोक्यावर पगडी घालणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती असे होते संभाजीराजांचे कर्तुत्व. छत्रपती संभाजी राजांचे बलिदान स्थान आत्ताच्या तरुण पिढीचे स्फूर्तिस्थान होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
|| देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था
महापराक्रमी महाप्रतापी एक ही शंभूराजा था ||
लेख : साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण ,संपर्क : 9011890279