थायलंडमध्येही तीव्र स्वरूपाचे धक्के ;अनेक इमारती कोसळल्या
ब्रम्हदेश (म्यानमार) आणि थायलंड या देशांत शुक्रवारी (28 मार्च) भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले असल्याचं समोर येत आहे. भूकंपाची तीव्रता 7.7 इतकी जास्त होती. आतापर्यंत या भूकंपात 144 जणांचा मृत्यू झाला आहे. एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकन जियोलॉजिकल सर्व्हे आणि जर्मनीच्या जीएफझेड सेंटर फॉर जिओसायन्स भूविज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी भूकंपाचा केंद्र म्यानमारमध्ये असल्याचं सांगितलं आहे.
थायलंडच्या राजधानीत, बँकॉकमध्येही भूकंपाचे झटके तीव्रतेने जाणवले. तिथल्या अनेक इमारती मोकळ्या केल्या जात आहेत. अमेरिकन जियोलॉजिकल सर्व्हेने भूकंपाची तीव्रता 7.7 सांगितली असली तरी चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने, भूकंप 7.9 तीव्रतेचा असल्याचं म्हटलंय. त्यांनी ही माहिती चायना अर्थक्वेक नेटवर्क्स सेंटर या चीनमधल्या भूविज्ञान संस्थेकडून घेतली.
भूकंपाचं केंद्र पृथ्वीच्या 10 किलोमीटर खाली म्यानमारच्या मंडाले शहराजवळच्या असल्याचं अमेरिकन जियोलॉजिकल सर्व्हेने म्हटलंय. भूकंपाच्या ताज्या फोटोंमध्ये इरावजी नदीवरचा विशाल पूलही पडल्याचं दिसत आहे. म्यानमारची राजधानी नेपिडोच्या रस्त्यांवरही भेगा पडल्या आहेत, अशाही बातम्या येत आहेत.
थायलंडच्या राजधानीत बँकॉकमध्ये भूकंपाचे झटके बसल्यानंतर इमारती खाली कोसळताना दिसतायत. लोक त्यापासून दूर पळतायत. एका इमारतीतल्या स्विमिंग पूलमधील पाण्यात उंच लाटा निर्माण होत असल्याचं एका व्हीडिओत दिसलं. या संदर्भात थायलंडच्या सरकारने एक आपत्कालिन बैठकही केली. भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारमधील सागँग शहरापासून 16 किमी दूर वायव्य दिशेला मांडले शहराजवळ असल्याचं अमेरिकन जियोलॉजिकल सर्व्हेने सांगितलं. हे ठिकाण देशाच्या राजधानीपासून जवळपास 100 किमी उत्तरेच्या बाजूला आहे.