“अवघड झाले पालकत्व”

0

‘पालकत्व’ या शब्दातच मोठी जबाबदारी जणू खांद्यावर ठेवली आहे की काय? असे भासवणारा हा शब्द .पालकत्व मला वाटते नुसते मुलांच्या जन्मापासून आई-वडिलांना बहाल केले जात नाही, तर त्याची सुरुवात त्याआधी पासूनच होत असावी. आई वडील होण्याच्या आनंदाबरोबर ते पालकत्व निभावेल का? पेलवेल का? आपण आता प्रौढ झालो!, मॅच्युअर वागावे लागेल! यासारख्या एक ना असंख्य गोष्टींच्या विचारांनी पालकत्वाचा प्रारंभ होताना दिसतो. मुलांना सध्याच्या परिस्थितीत संभाळायला सुद्धा काही पालक तयार नासतात ,त्यामुळे ही जबाबदारी घेण्यासाठी सुद्धा पालक होण्यासाठी बरीच जोडपी तयार होत नाहीत. तो एक वेगळाच विषय आहे.

     पालक झाल्यावर मुलांवर लहानपणी प्रेमाचा वर्षाव होतो. पण जस जसे मुले मोठे होऊ लागतात तसे मुलांकडून पालक अपेक्षा करू लागतात, यात अभ्यास करणे, खेळाची, मित्राची निवड करणे ,शिस्तबद्धपणा, स्वच्छता अशा एक ना अनेक घटकांचा समावेश होतो. मग आपले अनेक नियम मुले ऐकत नाहीत म्हटल्यावर त्याच्यावर_ ओरडणे, मारणे ,नाराज होणे ,हे सहजरित्या पालकांकडून होऊ लागते.

   

आपली स्वप्न मुलांनी पूर्ण करावी म्हणून जणू त्यांनी जन्म घेतला असे पालकांना वाटते. अनेक पालक हे स्पष्टपणे बोलून दाखवतात. त्यात त्यांना काही गैर ही वाटत नाही हे एक आणखीन नवल . मला हे जमले नाही पण ते तू करावे अशी माझी अपेक्षा आहे असे पालक आग्रह धरतात . मुलांचे बालपण घडवताना पालकांनी स्वतः आपण कसे होतो?  हेही थोडे आठवले तर बरे होईल आणि त्यामुळे आपलेच प्रतिबिंब म्हणजे ही मुले आहेत याचा विसर पडणार नाही .

थोडसं भूतकाळात डोकावून पाहिले तर लक्षात येते की मागच्या पिढ्यांनी असे मुलांवर’ तू हेच केले पाहिजे ‘अशी जबरदस्ती केलेली दिसून येत नाही. पाहा आपण म्हणतो परिस्थिती बदललेली आहे पण मुलांना आधीची परिस्थिती माहीत होती का बरं? बदललेल्या परिस्थितीत तर आपण आहोत ना. स्पर्धा आपण करतो आणि ती स्पर्धा मुलांना बोट धरून आपण दाखवतो. मुलांचा शारीरिक विकास होताना त्याच्या भावनिक परिवर्तनाचे निरीक्षण पालकांकडून होणे गरजेचे असते. सगळी मुले सारखे नसतात संपूर्ण जगात एक सारखी दोन मुलगे सापडणार नाहीत हा निसर्ग नियम म्हणावा लागेल मग आपण आपल्या मुलाची तुलना दुसऱ्याशी करणारे आपण कोण? मुलांना हवी ती गोष्ट सुविधा पुरवणे म्हणजे पालकत्वाची जबाबदारी पूर्ण करणे नाही तर त्याच्याजवळ बसून आनंदाने, प्रेमानं गप्पा मारणे त्याच्या समस्या गोड बोलून विचारून घेणे महत्त्वाचे आहे .त्यामुळे मुलांच्या मनातील पालकांविषयी वाटणारी भीती. तिरस्कार आणि नुसती कटकट हा भाव दूर होईल बऱ्याचदा अति प्रोटेक्शन किंवा काळजीवाहूपणा सुद्धा मुलांना नकोसा होतो. तोही मर्यादित स्वरूपाचा असावा. पडल्याशिवाय ‘वेदना ‘काय असते ?याची जाणीव होत नाही. तसेच काम केल्याशिवाय कष्टाचे महत्त्व कळणार नाही ,आपण त्याला हे कष्ट करून दिले नाही तर त्याला ते कळणार नाही आणि त्यामुळे त्या गोष्टीचे महत्त्व उमगणार नाही. घरात येणारी प्रत्येक गोष्ट सहजरित्या मुलांना पुरवली गेली तर या चंगळवादामुळे मुले या खळखळत्या पैशाच्या पुरात सहजपणे हरवून जाणार आहेत.

   पालकांचे कष्ट मुलांना कळण्यासाठी प्रत्येक गोष्ट देताना विचारपूर्वक देणे आवश्यक आहे. मग ते खाण्याचे साधे सतत दिले जाणारे जंक फूड असू द्या किंवा मोबाईल सारख्या महागड्या वस्तू असू द्यात .पण त्याची दुसरी बाजू ही लक्षात ठेवूया की, पदोपदी त्याला हिणवून ,टाकून बोलून देखील चालणार नाही. कारण किशोरवयीन मुलांच्या बाबतीत मनात असलेला अहंभाव, त्याच्यात होणारा नैसर्गिक  बदल  कायमच पालकांना लक्षात ठेवावा लागणार आहे .

    भरमसाठ फी भरून आपण मुलांना शिक्षण देतो आणि त्याच्या बदल्यात त्यांनी मोठेपणी तेवढ्या ताकदीची तोला मोलाची नोकरी मिळवली पाहिजे अशी भाबडी अपेक्षा पालक म्हणून आपण  करतो. आपण कोठे पैसा इन्व्हेस्ट करतो हेही एक संशोधनाचा विषय म्हणावा लागेल.

   

 पालकांचे अंधानूकरण मुले करतात. हे चुकीचे विधान नाही कारण पालक 24 तास मोबाईल वापरत असेल आणि मुलांना टीव्ही पाहू नकोस!, मोबाईल पाहू नको! असा सल्ला दिला जात असेल तर मुले हे ऐकतील का?  मुले या सूचना ऐकतील असे वाटत नाही .त्यापेक्षा आपण पालक म्हणून वाचन, लेखन केले त्याचा प्रभाव मुलांवर होणार आहे .पालक हा खरा आरसा असतो. मुलाचा, अगदी शंभर टक्के नाही पण कुठेतरी त्यांची त्याला लाभलेली संगती त्याचा प्रभाव त्या मुलावर पडलेला दिसतो. एक चांगला नागरिक घडवण्याची जबाबदारी घरातूनच सुरू होते. चांगले मूल हे पुढे जाऊन एक सक्षम नागरिक होण्यासाठी कुटुंबातूनच त्याची पायाभरणी भक्कम करणे आवश्यक आहे. पालकत्व हेही डोळसपणाने केलेला संस्कार आहे .आणि आचरणाच्या पायावर उभे राहिलेले असावे. 

     आपण कमावलेला पैसा हा कष्टाचा आहे .तो काटकसरीने वापरावा हे संस्कार मुळातच पालकांनी करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्या मुलांना विचार करायला लावला पाहिजे. शिवाय आपण स्वतःच जर वाम मार्गाने पैसा घरात घेऊन येत असेल तर काय बोलावे मग?. मुलांनी आपल्याला आदर्श मानावे का? बाकी थोडक्यात एवढेच की पालकत्व आता म्हटले तर सोपे आहे आणि म्हटले तर अवघड आहे.

सौ शुभांगी पंकज बोबडे  ,फलटण ,जिल्हा सातारा 

भ्रमणध्वनी ९४२३८१६८८४ shubhangibobade2@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here