ट्रम्प यांचा भारतावर 26 टक्क्यांचा टॅरिफ बॉम्ब

0

 नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर रेसिप्रोकल टॅरिफची घोषणा केली आहे. अमेरिकेनं भारतावर 26 टक्के टॅरिफ लावलेले आहे.

टॅरिफ म्हणजे एखाद्या देशातून आयात करणाऱ्या वस्तूंवर लावलेलं शुल्क होय. आता भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर 26 टक्के टॅरिफ लावलं जाईल.याचा भारतातील वेगवेगळ्या क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, सर्वाधिक प्रभाव कृषी क्षेत्रावर पडण्याची भीती तज्ज्ञ बोलून दाखवतात.

 

दरम्यान, ट्रम्प यांनी लादलेल्या टेरिफबद्दल भारताची भूमिका काय असेल? भारत काय करणार आहे? असा प्रश्न केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांना विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले “डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी अमेरिका प्रथम आहे, तर मोदींसाठी भारत प्रथम आहे. आम्ही या टॅरिफचा काय परिणाम होऊ शकतो त्याचं विश्लेषण करू आणि त्यानंतर निर्णय घेऊ.” असे मोघम उत्तर त्यांनी दिले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ ही मोहीम हाती घेतली आहे आणि त्यादृष्टीनं त्यांनी हे नवीन तंत्र आखलं आहे. “भारतीय वस्तूंवर अमेरिकेत 26 टक्के टॅरिफ लावल्यामुळे अमेरिकेच्या बाजारपेठेत भारतीय वस्तू महाग होतील. मग तिथल्या जनतेवर याचा परिणाम होणार नाही का? तर तिथल्या जनतेचं उत्पादन चांगलं आहे, ते श्रीमंत आहेत, त्यांची क्रयशक्ती जास्त आहे. त्यामुळे ते या वस्तू घेऊ शकतात.” “पण, महाग आहे म्हणून त्यांनी या वस्तूच घेतल्या नाहीतर भारताच्या निर्यातीत घट होईल. परिणामी भारताला उत्पादन कमी करायला लागेल. त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर आणि शेतीवर आधारीत असलेल्या मजुरांवरही होणार आहे.

“भारत-अमेरिका यांच्यातील व्यापार करार सध्या दोन ते अडीच बिलियन डॉलर्सचा आहे. तो 5 बिलियन डॉलर्सवर नेण्यासाठी ट्रम्प प्रशासनाचे प्रयत्न आहेत. त्यासाठी हे शुल्क लादण्यात आलं आहे. याचा थेट परिणाम भारतीय शेतकऱ्यांवर होईल.” अशी भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे.

ट्रम्प यांनी टॅरिफची घोषणा केल्यानंतर आशियाई देशांवर विशेष परिणाम झालेत. अमेरिकेनं चीनवर 34 टक्के, व्हिएतनामवर 46 टक्के आणि कंबोडीयावर तर 49 टक्के टॅरिफ लादला आहे. या देशांच्या तुलनेत भारतावर लावलेला टॅरिफ बरा म्हणावा लागेल. तरीही आशिया डिकोडेड या संस्थेच्या प्रियांका किशोर सांगतात की, भारतावर लावलेला 26 टक्के टॅरिफ खूप जास्त आहे आणि त्याचे इथल्या रोजगारावर गंभीर परिणाम होतील. या टॅरिफमुळे भारतातल्या घरगुती बाजाराची मागणी कमी होई शकेल. त्याचा भारताचा आर्थिक वृद्धीवर परिणाम होईल. विशेषतः आपली अर्थव्यवस्था आधीच कमी वेगानं चालली आहे.

व्हिएतनामसारख्या देशावर अमेरिकेनं अधिक टॅरिफ लावल्यामुळे व्यापार मार्ग बदलू शकतो. त्याचा भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला थोडा फायदा होईल. तरीही, ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला तोटा होण्याची शक्यता कायम राहणार आहे.

भारत तांदूळ, कोळंबी, मध, एरंडेल तेल, काजू, फळ, भाजीपाला, डेअरी प्रोडक्ट, कॉफी, चहा आणि कोको पावडर, मसाल्याचे पदार्थ अमेरिकेत निर्यात करतो, तर अमेरिकेतून बदाम, अक्रोड, पिस्ता, सफरचंद आणि कडधान्य भारतात येतं.पण, अमेरिकेचा डोळा भारतातल्या कृषी बाजारपेठेवर आहे. याआधीही अमेरिकेनं भारताची कृषी बाजारपेठ खुली करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता अमेरिकेनं लादलेल्या टॅरिफमुळे भारतीय कृषी क्षेत्रावर याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here