हैदराबाद : रस्ते आणि विकासाच्या नावाखाली जगभरात जंगलांची आणि झाडांची कत्तल केली जात आहे. यामुळे पशु पक्ष्यांची घरे नष्ट होतायत आणि पशु पक्षी बेघर होत आहेत. आता सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात रात्रीच्या अंधारात मोर ओरडताना दिसत आहेत.
हैदराबाद विद्यापीठात ४०० एकर जमिनीवरील झाडं तोडत असताना तिथल्या मोरांचा हा आवाज आहे. मोरांच्या ओरडण्याचा हा आवाज वेदनादायी आहे.
मोरांच्या ओरडण्याच्या आवाजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. तेलंगनाच्या हैदराबाद शहरात मध्यवर्ती भागात असलेल्या गाछीबाऊलीच्या जवळ एका जंगलातील आहे. हैदराबादमध्ये जवळपास ४०० एकर परिसरात कांचा जंगल आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडं आहेत. अनेक पशु पक्षी इथं आढळतात. कांचा जंगलाला हैदराबादचं फुफ्फुस असंही म्हटलं जातं.
शेकडो एकर परिसरात पसरलेल्या जंगलात रात्रीच्या अंधारात झाडांची कत्तल सुरू होती. लागोपाठ सुट्ट्या असल्यानं हैदराबाद विद्यापीठात विद्यार्थी-विद्यार्थींनी घरी गेले होते. त्यावेळी ही झाडे कापली जात होती. विद्यापीठाच्या आजूबाजूला हा हिरवागार परिसर असून जंगलतोडीच्या विरोधात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.