नांदेड प्रतिनिधी : नांदेडमध्ये महिला मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर विहिरीत कोसळून मोठा अपघात घडला आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये तब्बल ८ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नांदेड परिसरातील आलेगावमधील कांचननगर या ठिकाणी हा अपघात घडला. हिंगोली जिल्ह्यातील काही महिला मजुरांना घेऊन हे टॅक्टर जात असताना हा अपघात घडला आहे.
या महिला हळद काढणीसाठी जात होत्या, याचदरम्यान लेगावमधील कांचननगर या ठिकाणी असलेल्या एका विहिरीमध्ये हा ट्रॅक्टर कोसळला, चालकाना विहिरीचा अंदाज न आल्यानं हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ज्या विहिरीत हा ट्रॅक्टर कोसळला त्या विहिरीत पाणी होतं. पाण्यात बुडून आठ जणींचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे मृत महिलांच्या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. साहेब माझी आई पाहिली का हो, असा आर्त टाहो या अपघातानंतर एका चिमुकलीनं फोडला आहे. या मुलीच्या प्रश्नानं सर्वांचीच मन हेलावली.
या अपघातामध्ये कोणी आपली आई गमावली तर कोणी पत्नी, बहीण गमावली. या घटनेत ज्याच्या पत्नीचा मृत्यू झाला त्या व्यक्तीनं सांगितलं की, माझ्या पत्नीचं आणि माझं सकाळीच बोलणं झालं होतं, मी रात्रभर हळद शिजवण्याचं काम करून घरी परतलो होतो, पत्नी मला म्हणाली होती दुपारी एक वाजता येते. मात्र माझी पत्नी परतलीच नाही, असं या व्यक्तींनं म्हटलं आहे, तर आता माझ्या तिन्ही नाताचा सांभाळ कोण करणार असा सवाल आपली सून गमावलेल्या एका आजीनं केला आहे.