दौंड-रावणगाव, परशुराम निखळे :
खानावटे (ता. दौंड) येथील रामचंद्र शंकर चव्हाण यांच्यावर अनधिकृत माती उपसा, साठवणूक व वाहतूक प्रकरणी महसूल विभागाने मोठी कारवाई करत तब्बल 95,15,012 रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही कारवाई महाराष्ट्र खनिज (विक्री व विकास) नियम अंतर्गत करण्यात आली असून, चव्हाण यांनी अंदाजे 1100 ब्रास मातीचा अनधिकृत साठा करून तिची वाहतूक केल्याचे प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले आहे.
दौंड तहसील कार्यालयाच्या अधिकार्यांनी या प्रकरणात चौकशी करताना संबंधित परिसरात झालेला माती उपसा, साठवणूक व त्याचा गैरवापर याचा तपशील गोळा केला. नियमबाह्यपणे खनिज संपत्तीचा उपसा झाल्याने प्रति ब्रास 8050 रुपयांचा हिशेब लावून एकूण रक्कम 95 लाखांहून अधिक ठरवण्यात आली आहे. महसूल प्रशासनाकडून चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली असून, ठरवलेला दंड का वसूल करू नये, याचे कारण स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक पातळीवर खनिजांचा बेकायदेशीर वापर रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने उचललेले पाऊल निश्चितच महत्त्वाचे मानले जात आहे. यापुढे अशी कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. महसूल विभागाने खनिजांची लूट थांबवण्यासाठी सखोल तपास आणि कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.